Bookstruck

गोष्ट चाळीसावी

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

गोष्ट चाळीसावी

चुकलेल्याला मार्गी लावावे व पदरी पुण्य पाडून घ्यावे.

एका गावी 'कामातुर' नावाचा एक वाणी राहात होता. म्हातारपणी त्याची बायको मरताच, त्याने दारिद्र्याने गांजलेल्या दुसर्‍या एका वाण्याला भरपूर पैसे देऊन, त्याच्या तरुण मुलीशी लग्न केले. पण ती त्या म्हातार्‍या नवर्‍याला साधे जवळसुद्धा येऊ देईना.

एके दिवशी मध्यरात्री तो वाणी व त्याची तरुण बायको एकमेकांकडे पाठ करून पलंगावर झोपली असता, त्यांच्या घरात चोर शिरला. त्याच्या खुडबुडीने जाग आलेल्या त्या तरुणीच्या तो दृष्टीस पडताच, ती घाबरली व आपल्या म्हातार्‍या नवर्‍याला बिलगली. त्या नवर्‍याला या गोष्टीचे आश्चर्य वाटले. पण डोळे उघडताच, जेव्हा त्याला कोपर्‍यात चूपचाप उभा असलेला चोर दिसला, तेव्हा आपली बायको आपल्याला का बिलगली याचा उलगडा होऊन तो त्या चोराला म्हणाला, 'तुला भ्यायल्यामुळे का होईना, माझी बायको मला बिलगली. नाहीतर आजवर ती मला कधी साधा स्पर्शही करीत नव्हती. देव तुझे भले करो. जा तू, तू चोर असलास तरी मी तुला क्षमा करतो.'

चोर म्हणाला, 'माझ्यावर उपासमारीचा प्रसंग आल्यामुळे मी चोर बनलो. त्यामुळे मी खरा गुन्हेगार नाही. तू मात्र - तुला नात शोभेल अशा - एका मुलीशी लग्न केल्यामुळे, खरा गुन्हेगार आहेस.'

चोराच्या बोलण्याने, पश्चात्ताप पावून, त्या वृद्ध पण धनिक वाण्याने त्याला आपले अर्धे धन दिले व म्हटले, 'यापुढे या पैशात उद्योगधंदा करून तू चांगले जीवन जग व आणखीही काही हवे असले तर माझ्याकडे येऊन माग.'

यावर तो चोर म्हणाला, 'हे वाण्या, तू मला तुझे काही धन दिलेस त्याबद्दल मी तुझा आभारी आहे. पण मला जसा तू सन्मार्गाने जायला सांगतोस, तसा तूही सन्मार्गाने जा. त्या तरुणीचे आयुष्य वाया न घालविता तिचा मोह सोड व तिचे माझ्याशी लग्न लावून दे. तू मला आणखी काही हवे असले तर ते मागायला सांगितलेस, म्हणून मी हे मागितले. तुझा तसा पक्का विचार झाला तर मला कळव म्हणजे मी तिला न्यायला येईन.'

ही गोष्ट मंत्री दीप्ताक्ष याने अरिमर्दनराजाला सांगितली व तो त्याला म्हणाला, 'महाराज, त्या वृद्ध वाण्याने त्याच्याकडे चोरी करायला आलेल्या एका चोराला आपले धन दिले, मग स्थिरजीवी हा तर शरणार्थी आहे. तेव्हा त्याला आश्रय का देऊ नये?'

मग राजा अरिमर्दनाने आपला चौथा मंत्री वक्रनास याला सल्ला विचारला असता, तो म्हणाला, 'स्थिरजीवी हा जरी शत्रू असला तरी, कावळ्यांची मर्मस्थाने समजून घेण्यासाठी त्याचा उपयोग करून घ्यावा. राक्षस व चोर याच्या भांडणात जसा त्या ब्राह्मणाचा फायदा झाला, तसा आपलाही फायदा होऊन जाईल.' राजा अरिमर्दनाने ती गोष्ट काय आहे?' असे विचारले असता वक्रनीस म्हणाला, 'ती गंमतीदार गोष्ट आहे -

« PreviousChapter ListNext »