Bookstruck

गोष्ट एकाहत्तरावी

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

गोष्ट एकाहत्तरावी

नशीब असे जोराचे, तेव्हा अमृत बने विषाचे.

उत्तरेकडील मधुपूर राज्याचा राजा 'मधुसेन' याला एक अत्यंत देखणी, परंतु तीन स्तने असलेली मुलगी झाली. 'ही अशुभलक्षणी मुलगी आपल्या राज्याचा व घराण्याचा सत्यानाश करील. तेव्हा आताच सेवकांकरवी हिला वनातील वन्य श्वापदांच्या स्वाधीन करावे,' असा विचार राजाच्या मनात येऊ लागला असता, काही विशालह्रदयी धर्मपंडित त्याला म्हणाले, 'महाराज, काही झाले तरी ही आपली मुलगी आहे. तेव्हा हिला वनात सोडून न देता, हिचे आपल्याला चुकूनही दर्शन होणार नाही, एवढ्या दूरच्या स्थळी हिला दासदासींबरोबर पाठवावे व त्यांनाच तिचे लालनपालन करायला सांगावे.' राजाने त्याप्रमाणे केले.

अशी काही वर्षे निघून जाताच, ती मुलगी वयात आली, तेव्हा राजाने सेवकांकरवी राज्यात दवंडी पिटविली, 'जो कुणी तीनस्तनी राजकन्येशी लग्न करील, त्याला एक लाख सुवर्णमोहोरा हुंडा म्हणून देण्यात येईल. मात्र लग्न होताच त्याला व तिला दूरवर पाठविण्यात येईल.' एका गरीब आंधळ्याने ते मान्य केले व त्याचे तिच्याशी लग्न झाले.

लग्न झाल्यावर आपल्या तीनस्तनी बायकोसह दूरदेशी जाताना त्या आंधळ्याने, त्याला कुठेही जायचे असले तर, त्याचा हात आपल्या हाती घेऊन पोहोचविणार्‍या आपल्या एका कुबड्या मित्रालाही बरोबर घेतले. पण दूरदेशी जाऊन बिर्‍हाड थाटल्यावर थोड्याच दिवसांत त्या राजकन्येच्या मनात विचार येऊ लागला, 'आपण एवढ्या सुंदर असूनही आपल्या नवर्‍याला दिसत नसल्याने तो आपल्या रूपाचे कौतुक करीत नाही. तेव्हा याच्यापेक्षा त्या डोळस कुबड्याशी जर आपले लग्न झाले असते, तर बरे झाले असते.'

मनात हा विचार येऊ लागताच, एकदा ती त्या कुबड्याला म्हणाली, 'तुम्ही जर वीष आणून दिलेत, तर मी ते जेवणातून माझ्या आंधळ्या नवर्‍याला घालीन आणि तो मेला की तुमच्याशी लग्न करीन.'

तिच्या या कल्पनेवर कुबडा एकदम खुश झाला व थोड्याच वेळात एक मेलेला विषारी सर्प घेऊन घरी आला. मग तो तिला म्हणाला, 'मी या सर्पाचे लहान लहान तुकडे करतो. तू त्याचे सांबार कर व जेवताना नवर्‍याला खायला घाल, म्हणजे तुझीमाझी इच्छा फलद्रूप होईल.' याप्रमाणे बोलून त्या कुबड्याने त्या सर्पाचे तुकडे करून तिच्या स्वाधीन केले व तो घराबाहेर पडला.

इकडे त्या राजकन्येने त्या तुकड्यांमधे मालमसाला घालून, त्याचे सांबार करण्यासाठी ते एका वेगळ्या चुलीवर रांधले व आपल्या आंधळ्या पतीच्या हाती एक पळी देऊन 'ते माशांचे कालवण या पळीने अधुनमधून ढवळत राहा,' असे सांगितले आणि त्याचा हात धरून त्याला त्या चुलीपाशी नेऊन बसविले. मग ती आपल्या नेहमीच्या चुलीवर स्वैपाक करायला गेली.

तो आंधळा त्या चुलखंडापाशी सांबार पळीने ढवळत असता, त्यातून निघणार्‍या वाफा त्याच्या डोळ्यांना लागून त्याला चांगली दृष्टी आली आणि सांबारात रटरटत असलेले ते सापाचे तुकडे पाहून आपणाविरुद्धच्या कारस्थानाची त्याला कल्पना आली. तरीही तो आंधळेपणाचे सोंग पांघरून वावरू लागला. तेवढ्यात बाहेर गेलेला कुबडा आत आला आणि 'सापाचे सांबार तयार होत आले का?' असे त्या राजकन्येला खुणांनी विचारू लागला. त्याबरोबर ती राजकन्या त्याला हळूच सांगण्यासाठी त्या चुलीजवळून उठली आणि त्याच वेळी त्या डोळस आंधळ्याने त्या कुबड्याकडे धाव घेतली. मग त्याचे दोन पाय पकडून व त्याला गरगर फिरवून त्याने त्याला आपल्या बायकोच्या अंगावर भिरकावले. त्यामुळे त्याचे मस्तक थाडकन् तिच्या तिसर्‍या स्तनावर आदळून तो स्तन नाहीसा झाला व तो कुबडा नंतर जोराने जमिनीवर पाठमोरा आदळल्याने त्याच्या पाठीतले कुबड नाहीसे झाले !

मग लज्जित झालेला तो 'कुबडा' तिथून कायमचा निघून गेला आणि पश्चात्तापाने पावन झालेल्या त्या राजकन्येचा व तिच्या त्या डोळस नवर्‍याचा संसार सुखाने सुरू झाला.'

ही गोष्ट सांगून चक्रधर म्हणाला, 'मित्रा, 'कर्म तसे फळ' हे तुझे म्हणणे खरे असते, तर त्या राजकन्येचे व कुबड्याचे कर्म वाईट असता, त्यातून त्यांना चांगले फळ मिळाले असते का?'

सुवर्णसिद्धी म्हणाला, 'कुठेतरी कधीतरी घडून येणार्‍या घटनेचा दाखला पुढे करून सिद्धांत सिद्ध होत नाही. अविचाराने प्रत्येक बाबतीत वाद घालत राहिल्याने, पदरात केवळ हानीच पडते. म्हणून हेकटपणाने वागणे सोडून द्यावे. एक पोट पण तोंडे मात्र दोन असलेल्या त्या भारुंड पक्ष्यांच्या दोन्ही तोंडांचे एकमेकांशी न पटल्यामुळेच त्या पक्ष्याचा नाश झाला ना?' यावर तो कसा?' असा प्रश्न चक्रधराने असता सुवर्णसिद्धी म्हणाला, 'ऐक-

« PreviousChapter ListNext »