Bookstruck

असाच एक किस्सा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List
माझ्या मित्राला काही महिन्यांपूर्वी आलेला एक मजेदार अनुभव. अनुभव जरी मजेदार असला तरी त्यामधून एक बोचणारा पण तेवढाच मौलिक संदेश नक्कीच मिळतो. आता तो घेणं नं घेणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.

तर.. कामावरून घरी परतत असताना माझ्या मित्राला, तो प्रवास करत असलेल्या रेल्वेच्या डब्ब्यातून जोरदार भांडणाचा आवाज ऐकू आला. नजर देवून पाहिलं तर त्याला दोन तिशीतले तरूण दात-ओठ खात भांडताना दिसले. कदाचित रेल्वेमध्ये चढताना एकाचा चुकून धक्का लागला होता दुस-याला. त्यावरूनंच काय ती त्या दोघांच्यात खडाजंगी सुरू झाली होती. दोघेही हिंदी भाषिक वाटत होते. निदान त्यांच्या हिंदीत चाललेल्या भांडणावरून तरी तसंच वाटत होतं. दोघं भांडणात एकमेकांचा अगदी यथेच्छ उध्दार करत होते.! हा त्याची आई काढतोय, तो त्याचा बाप काढतोय.. कोणीच माघार घ्यायला तय्यार नव्हतं. डब्ब्यातले बाकीचे प्रवासीसुद्धा दिवसभराचा थकवा विसरून त्यांची चाललेली शब्दांची धुमचक्री बघण्यात पार गुंग झाले होते. शेवटी काय तर, दुस-यांचं भांडण म्हणजे आपलं मनोरंजन ही वुत्तीच झाली आहे सर्वांची. असो, तर त्यांचं भांडण क्षणाचीही उसंत नं खाता साधारण असंच पाच दहा मिनिटं सुरू होतं. शेवटी त्यातल्या एकाने आपल्या खिजगणीतून एक शेवटचं पण तितकंच सशक्त हत्यार(मुद्दा) काढलं "भूमीपुत्राचं".. तसं तर हे हत्यार प्रत्येकजणंच स्वतःच्या बचावापुरतं वेळोवेळी वापरत आला आहे. मग हाच मुद्दा पुढे करत तो त्याला उद्देशून इतर प्रवाश्यांकडे नजर फिरवत बोलला,"ये लोग ऐसे ही होते है साले..बाहर सें आते है ईधर और होशियारी करतें है.. साला भैया कुठचा.."(हि एकंच ओळ काय तेवढी ह्या पठ्ठ्याने मराठीत बोलली बुवा..!!) "ये मी नाहीए भैय्या, मराठीच आहे मी", दुसरा पचकन बोलून मोकळा झाला.! दुस-याच्या ह्या उत्तराने मात्र डब्ब्यात क्षणार्धात चिडीचुप शांतता पसरली. ऐव्हाना आपण तोंडावर दनकन आपटलोय हे त्या दोघांच्याही लक्षात आलं होतं.  त्यामुळे त्यांचा चेहरा हा निवडणूकीमध्ये डिपोझिट जप्त झालेल्या एखाद्या नेत्यागत झाला होता..!!एकमेकांकडे खजीलपणे पाहण्याखेरीज आता त्यांच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता.  तेव्हा मग शांततेला संपावर पाठवत डब्ब्यामध्ये हसण्याचा भोंगा वाजू लागला. डब्ब्यातील सर्वांचीच हसून हसून पार हालत खराब झाली होती आणि ते दोघे बिच्चारे पुढचं स्टेशन येण्याची वाट चातकाप्रमाणे बघत होते. शेवटी एकदाचं स्टेशन आलं आणि ह्यांनी जराही विलंब नं लावता सरळ डब्ब्यातून धूम ठोकली..!!

तात्पर्य : उगाच नको तिथे हिंदीची लाचारी पत्करून असं चार चौघांत स्वतःचा डब्बा गूल करू नका...!!!

- सतीश रमेश कांबळे
« PreviousChapter List