Bookstruck

बाल्य 6

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''खरेंच. रात्र आहे हें मी विसरलोंच. निजूंदे.''  काशिनाथ तिकडे आईबापांच्या क्रिया करित होता. तों आनंदराव अधिक म्हणून तारं आली. परंतु तो येण्याच्या आधींच आनंदराव देवाघरीं निघून गेले होते. काशिनाथ आला तों घरांत अंधार होता. रात्रीं बहीण भाऊ बोलत होतीं.

''काशी, रडूं नको; मी आहें तुला. एकदमच आकाश कोसळलें. काय करायचें.''
''असा रे कसा देव ? पंधरा दिवसांत त्यानें तिघांना नेलें.''

''ताई, देवाचे हेतु अतर्क्य आहेत. आपणांला काय कळणार ? मी उद्यां पुण्याला जातों. पुढें लौकरच तुम्हांला न्यायला येईन.''
''मरतांना म्हणाले रंगाला जप. तो गुणांचा आहे.''
''तूं काळजी नको करुं. मी माझ्या मुलांप्रमाणें त्याचेंहि करीन.''
मामा जायला निघाला. त्यानें भाच्याला जवळ घेतलें, कुरवाळलें.
''रंगा, आतां पुण्याला ये हो.''
''आई पण येईल ?''
''हो. तुम्ही दोघं या.''

''मला रंगाची पेटी द्याल ? बाबा देणार होते. माझ्या वाढदिवशीं देणार होते. नाहीं आई?''

''मामा देईल हो तुला.''
बहिणीचा निरोप घेऊन भाऊ निघून गेला. दिवस जात होते. काशी रडत बसे. पतीची, आईबापांची तिला राहूनराहून आठवण येई. रंगा जवळ असला म्हणजे ती दु:ख लपवी. ती हंसे, आनंदी दिसे. माझा बाळ सुखी असो, त्याला कशाची ददात नसो, असें ती मनांत म्हणे. तो निजला म्हणजे त्याच्या डोक्यावर हात ठेवून ती विश्वंभराची प्रार्थना करी.

« PreviousChapter ListNext »