Bookstruck

मामाकडे 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

स्वाभिमानी माता आपलें दु:ख मुलावर रागवून प्रगट करित होती. बिचारा रंगा. आईच्या प्रेमालाहि तो आज आंचवला होता. तो वाचीत बसला. शब्द घोकीत बसला.

रंगाच्या वर्गात एक मुलगा होता. त्याचें नांव पंढरी. पंढरीहि पोरका होता. चुलत्यांकडे तो शिकायला होता. त्याचेहि हाल असत. एके दिवशीं तो रडत रडत शाळेंत आला.

''पंढरी, काय झालें तुला ?'' रंगानें विचारलें.
''काकूनें मारलें. न जेवतां पाठवलें.''
''तूं उपाशी आहेस ?''
''हो रंगा.''
''मधल्या सुटींत तूं माझ्या घरीं ये. माझी आई तुला जेवूं वाढील.''
रंगा मधल्या सुटीची वाट पहात होता. दोघें मित्र आले.
''रंगा, शाळा का सुटली ?'' आईनें विचारलें.
''आम्ही परत जाणार आहोंत. आतां मधली सुटी आहे.''
''आई, तुझ्या कानांत सांगायचें आहे.''
रंगानें हळूच आईला सारें सांगितलें.
''ये बाळ, ये हो. पोळी भाजी खा. ये''

रंगाच्या आईनें पंढरीला खाऊं घातलें. दोघे मित्र हंसत खेळत शाळेंत गेले. परंतु मामीला तें आवडलें नाहीं. तिच्या तोंडाचा पट्टा सुरु झाला:

''स्वत:च्या मुलाला घेऊन येथें आल्यात. आतां मुलाच्या मित्रांना जेवायला वाढा. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र. फुकाचा मोठेपणा नि चांगुलपणा मिरवायला काय जातें ! ये हो बाळ, जेव पोटभर. हा मेल्यांनो, कोणाचें घर, कोणाचें अन्न ! मला नाहीं हो हें सहन व्हायचें. मला एका शब्दानें तरी विचारलेंत कीं त्या पोराला देऊं का खायला ? मी मालकीण कीं तुम्ही ? भिकेला लावाल तुम्ही आम्हांला. आणि तो पोरगा विधुळा. नंबर म्हणे बत्तिसावा. तरी आईचे लाड सुरुच आहेत. आणि आतां मुलाच्या मित्रांचे लाड. सारें जग जणुं तुमचें. तरी बरें घर ना दार. तों ही ऐट.''

« PreviousChapter ListNext »