Bookstruck

मामाकडे 4

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''हो चालता. म्हणे फार आवडलें. पैसे आण बापाजवळून.''
''माझे बाबा नाहींत.''
''मग कोण आहे ?''
''मी मामांकडे आहे.''

''मग त्यांच्याजवळून आण पैसे. हीं चित्रें का फुकट वांटायला ठेवली आहेत मी ? नीघ येथून. नेशील फाडून बिडून. पोलीसांच्या ताब्यांत देईन बघ. हो दूर.''

रंगाला अशीं बोलणीं अनेकदां ऐकावीं लागत. फुलपांखराप्रमाणें तो हिंडत राही, चित्रें बघत राही. कोणी हांकललें तर निघून जाई.

आज रविवार होता. रंगाचा आज वाढदिवस होता. आईनें देवांना गूळ ठेवला. रंगाला अंगारा लावला. दुसरें ती माउली काय करणार ?

''रंगा, तेल जा आण. हे घे बारा आणे. नीट सांभाळून आण. लौकर ये'' मामीनें सांगितलें.

हातांत आलीमेलीची बरणी घेऊन रंगा निघाला. जुना बाजार भरलेला होता. रंगा चित्रें बघत निघाला. एका पुस्तकविक्याजवळ फारच सुंदर एक अंक होता. त्यांत काश्मीरचे देखावे होते. दुसरींहि चित्रें होतीं. झोंक्यावर झोंके घेण्यार्‍या एका मुलाचें चित्र होतें. रंगा रंगला. तो तेल वगैरे विसरला.

''या अंकाची काय किंमत ?''
''रुपया''
''बारा आण्याला देतां ?''
''आण बार आणे.''
रंगानें अंक विकत घेतला. नदीकिनारीं जाऊन बसला. तीं चित्रें तो पुन्हां पुन्हां बघत होता. तिकडे आकाशांत रंगशाळा उघडली. देवच्या घरीं किती रंग. परंतु मला कोण देणार ? आज माझा वाढदिवस. बाबा रंगाची पेटी देणार होते. कोठें गेले बाबा ? देवानें त्यांना का नेलें ? ते चांगले होते म्हणून आणि आम्ही का सारीं वाईट ? तो लहान मुलगा विचारांत होता.

तो उठला. ती बरणी हलवित तो घराकडे वळला.

« PreviousChapter ListNext »