Bookstruck

ताटातूट 5

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''मुसलमानांचे नांव नका काढूं.''
''श्री छत्रपतींनीं त्यांच्या मशीदींस इनामें करुन दिलीं. ऐका तर खरी गोष्ट. एकदां पैगंबरांकडे एक मनुष्य आला नि म्हणाला 'माझे भाऊ वाईट आहेत. ते प्रार्थनेला कधीं येत नाहींत. नमाज पढत नाहींत. तुम्ही त्यांची खरडपट्टी काढा.' पैगंबर म्हणाले 'ते देवाची प्रार्थना करित नाहींत, परंतु कोणाची चुगली करायलाहि ते माझ्याकडे आले नाहींत. तूं प्रार्थना करतोस, परंतु दुसर्‍यांची त्यांच्या पाठीमागें निंदा करतोस, चुगल्या करतोस. प्रार्थना करुन चुगलखोर बनण्यापेक्षां, चुगली न करणारा प्रार्थनाहीन बरा. तो खरा धार्मिक.'  आलें ना तुमच्या लक्षांत ? नुसतें देवदेव म्हणणें म्हणजे धर्म नव्हे.''

''मला तुमच्याशीं वाद करायचा नाहीं. या शाळेंत तुम्ही नको.''
''ठीक. तुम्हांला सद्बुध्दि सुचो. लहान मुलांची मनें व्देषानें भरुं नका. तीं निर्मळ मनें घाणीनें बरबटवूं नका. ते भयंकर पाप आहे.''

''आम्हांलाहि अक्कल आहे.''

वासुकाका बाहेर पडले. शिक्षकांच्या बैठकींत चर्चा चालली. मुलांत कुणकुण गेली. कांही मुलें म्हणाली 'आपण त्यांना निरोप देऊं.'

''हो. खरेंच. चला मुख्याध्यापकांना विचारुं.''
परंतु त्यांना परवानगी मिळाली नाहीं. शाळा सुटली. वासुकाकांनी सर्व शिक्षकांचा, प्रमुखांचा निरोप घेतला. मुलांची त्यांच्याभोंवतीं गर्दी उसळली.

''आतां आम्हांला हरिजन कोण वाचून दाखवील ?''
''लेनिनच्या गोष्टी कोण सांगेल ?''
''सुंदर चित्रें आणून कोण दाखवील ?''
''खरा इतिहास कोण शिकवील ?''

मुलें म्हणत होतीं. तिकडून शाळेचे चालक आले. त्यांच्या तोंडावर संताप होता. वासुकाकांविषयींचें तें प्रेम पाहून त्यांना मत्सर वाटला.

''जा रे घरी. येथें काय आहे ? निघा.''

« PreviousChapter ListNext »