Bookstruck

*आई गेली 4

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

काका म्हणतात चित्रकारानें सृष्टींत बुड्या घ्यायला हव्यात. आई, एक चिनी चित्रकार होता. समुद्राची वादळी भव्यता यथार्थपणें कळावी म्हणून तो वादळांत समुद्राच्या लाटांत उभा होता. घों घों लाटा उसळत येत होत्या. सों सों वारा वहात होता. आणि तो चित्रकार सर्वेंद्रियांचे नयन करुन समोरची फेसाळ, हेलावणारी भव्यता पहात होता. दुसरा एक चिनी चित्रकार उंच उर्वतावर जाई नि तेथें बसून सृष्टि बघे. काका म्हणाले ''उंच पर्वतावरची शुध्दता त्याच्या कलेंत येई.''  काकांचे एकेक सांगणें अपूर्व वाटतें.

काल काकूनें तुझी आठवण काढली होती. माठाची भाजी होती. कोरडी. तुला ती फार आवडते. आई, आपण उन्हाळ्याच्या सुटींत भेटूं हं ? तूं काळजी नको करुं. काकाकाकू आहेत तोंवर रंगा सुखी आहे. आणि तुझा आशीर्वाद नेहमीं जवळच आहे. नयनाला नमस्कार. माझें पदक तेथेंच असूं दे.
तुझा आवडता,
रंगा

''छान लिहितो रंगा पत्र'' नयना वाचून म्हणाली.
''काका त्याला शिकवतात.''

''आणि काशीताई लिहितो कसा कीं नयना डोळ्यांत खुपेल ! मी खुपेन का हो कोणाच्या तरी डोळ्यांत ? मी का दगड धोंडा आहें. कुसळमुसळ आहें खुपायला.''

''त्यानें गंमत केली. तुझें नांव नयना ना ? त्या शब्दावर त्यानें खेळ केला. लबाड आहे तो. त्याला खोड्या करायला हव्यात. लहानपणीं त्यानें माझें चित्र काढलें. मी म्हटलें त्यांचे कां नाहीं काढलेंस ? लगेच माझ्या चित्राला मिशा काढून म्हणाला हें त्यांचे ! मला हंसता थोडें झालें.''

''परंतु रंगा आतां गंभीर दिसतो.''
''गरिबी, अनुभव यामुळें अकालीं गंभीरता येते.''

एके दिवशीं वाढतां वाढतां काशीताईस घेरी आली. हातांतील पोळ्यांचें ताट पडलें. कोण धांवाधांव ! त्यांना उचलून नेण्यांत आलें. नयनानें त्यांना आपल्या खाटेवर गादीवर निजविलें. डॉक्टर आले. काशीर्ताईना शुध्द येईना. बराच वेळ झाला. काय करणार ?

''मेंदूंतील रक्तस्त्राव कारण आहे. अति काळजीमुळें झालें असावें. आम्हांला आशा नाही'' तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलें.

« PreviousChapter ListNext »