Bookstruck

*आई गेली 6

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

पंढरी रंगाला घेऊन गेला. कोठें गेले दोघे ? पर्वतीच्या बाजूला जाऊन कालव्याच्या कांठीं बसले. बोलणें बंद होतें. मधूनमधून रंगाचे डोळे पुन्हां भरुन येत.

''रंगा, तूं यंदां मॅट्रिक होशील. पुढें ?''

''मुंबईस कलाभवनांत जाईन. काका म्हणाले मी पैसे देईन. पुढें ते मला विश्वभारतींतहि पाठवणार आहेत. नंदलालांच्या पायांजवळ बसून धडे घेईन. कलेच्या अंतरंगांत शिरेन. कलेच्या आत्म्याची भेट घेईन.''

''मी मिलटरींत जाईन. तेथेंच हिशेब करीत बसेन. मुंबईस आलास तर मी भेटेन. एखादेवेळेस पेशावरकडेहि मला पाठवायचे. काय नेम ? मला सार्‍या जागा सारख्याच. माझें प्रेमाचें कोण आहे ? मी दूर गेलों काय, मेलों काय, कोण रडणार आहे ?''

''रंगा रडेल.''
''तुला मी पत्र पाठवीन. भारतमातेचा मी पुत्र; जेथें जाईन तेथें माझें घर, तेथें माझे भाऊ. देवानें मला मोठें केलें आहे. मला १६०० मैल लांब रुंद घर दिलें आहे. कोटयवधि माझीं भावंडें. लाखों माझे माय बाप.''

''तूं कवि होऊन जणूं बोलत आहेस.''
''तूं चित्रकार, मी कवि.''
''आपण एकमेकांस शोभतों. आपण दोघे पोरके. दोघे भारतमातेचे.''
''तूं अजून तेवढा बंधमुक्त नाहींस. काका काकू आहेत आणि नयना आहे.''
''आईचें सारें तिनें केलें.''


« PreviousChapter ListNext »