Bookstruck

रंगाचें आजारीपण 5

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''काका, रडूं नका. मी बरा होईन.''
''अरे, असें उठूं नये एकदम. रंगा, नीज बाळ. पडून रहा. असें उठूं नये.''

''मी बरा होईन; आई मला म्हणाली तूं बरा होशील. 'रहा काका काकूंजवळ. सुखी हो' असें म्हणाली. मला आई भेटली, बोलली. आतां मी बरा होईन. आई मला नेणार होती. परंतु मी नको म्हटलें. काका, आईपेक्षां का ब्रशांवर नि रंगावर माझे अधिक प्रेम आहे ?''

''रंगा, किती रे बोलशील ? तूं अशक्त झाला आहेस. तापांत हृदय दुबळें होतें. असें उठूं नये, फार बोलूं नये.''

''तुम्ही जवळ असल्यावर हृदय दुबळें कशाला होईल ? माझें हृदय वज्राचें आहे. तें कधीं मोडणार नाहीं.''

वासुकाका त्याला बोलूं देत होते. परंतु थोड्या वेळानें रंगा शान्त कोंकराप्रमाणें पडून राहिला. शाळेंतील विद्यार्थी मधून मधून तेथें बसायला येत. रात्रीं कधीं रघु येई, विठू येई. वासुकाका नि सुनंदा यांना जरा विश्रांति मिळे.

४२ दिवसानंतर नंदाचा ताप निघाला. हळुहळु त्याला बरें वाटूं लागलें. परंतु दोन महिने चालवत नव्हतें. सुनंदा त्याचा हात धरुन त्याला चालवी. कधीं वासुकाका चालवीत.

''मी तुमचा लहान बाळ जसा. मला चालायला शिकवतां. खरें ना काका ?''
''तूं आमचाच बाळ. तुझी आई आमच्या पदरांत घालून, आम्हांला देऊन गेली. वाटलें ती माउली देणगी परत नेते कीं काय ? परंतु या देणगीला आम्ही पात्र ठरलों. खरें ना रंगा ? आतां लौकर चांगला हो'' असें वासुकाका प्रेमानें म्हणत.

« PreviousChapter ListNext »