Bookstruck

मुंबईला 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

अशी ही लिली गोड मुलगी होती. रंगाला कधीं वेळ असला म्हणजे तो तिला समुद्रावर फिरायला नेई. तिला समुद्राच्या लाटांत नेई. तिच्याबरोबर तो शिंपलें गोळा करी. तिला वाळूंत किल्ले बांधून देई, बोगदे खणून देई. आणि त्यांच्याकडे बघत बघत लिली एकदम ओरडून त्यांच्यावर लाथ मारी नि सारें पाडी.

''लिले, हें काय ?''

''वाळूंतले किल्ले वाळूंत गेले. आतां पुन्हां बांध. मोडले म्हणजे पुन्हां बांधतां येतात, नाहीं भाऊ ?''

तिच्या बोलण्याचें रंगाला कौतुक वाटे. ती मुलगी सहज बोले. परंतु त्या मुलीच्या सहज बोलण्यांत त्याला अपार अर्थ दिसे. तो दिला एकदम उचलून घेई व तिचा पापा घेई.

''मला नाहीं आवडत पापा.''
''कां ग लिले ?''

''त्या तुझ्या मोरुदादानें माझा पापा घेतला नि थुंकी लागली माझ्या तोंडाला. मला नको पापा.''

''मी चांगला नाहीं ?''

''तूं चांगला आहेस. मी घेऊं तुझा पापा ?'' असें म्हणून ती चिमुरडी पोर रंगाचा पापा घेई नि त्याचा हळूच चावा काढी.

''हें काय लिलें ?''

''पापा फुकट नसतों म्हटलं. आई म्हणते लिले पापा दे, तर मी कांहींतरी मागतें आधीं. मग पापा. रंगा. अरे तो बघ पक्षी, पांढरा पांढरा, पाण्यांत चोंच मारली त्यानें, तो बघ डुलतो आहे, भाऊ बघ बघ.''

''तूं मला रंगा म्हणालीस.''

''पण लगेच पुन्हां भाऊ म्हटलें ना ? आईनें त्या दिवशीं मला मारलें. भाऊ नाहीं म्हटलेंस तर बघ म्हणाली. तुझ्यासाठीं मला मार. मग भाऊच कां रे नाहीं नांव ठेवलें ? रंगा नांव, म्हणायचें मात्र भाऊ.''

« PreviousChapter ListNext »