Bookstruck

मित्राचें पत्र 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

या सर्व आपत्तींत रंगाला कधीं कधीं पंढरीची आठवण येई. वासुकाकांच्या निधनाची करुणवार्ता त्यानें त्याला लिहिली. मी विश्वभारतींत जाणार होतो. आतां काय करायचें ? माझ्या मनांत कोठेंतरी नोकरी करावी असें येतें. परंतु सुनंदा आई नको म्हणतात. त्या विश्वभारतींत जायला मला आग्रह करित आहेत. त्यांचे मन कसें दुखवूं ? परंतु माझ्यासाठी त्या काम करणार, लोकांचे कपडे शिवणार. अरे, घर विकून टाकावें असेंहि ही माउली म्हणाली. पंढरी, कोठें हे उपकार फेडूं ? मी कोठला कोण ? परंतु हे दोन जीव माझ्यावर मायेची पाखर घालित होते. एक थोर जीव देवाघरीं गेला. दुसरा या जगांत कर्मयोग आचरित आहे. मी विश्वभारतींत गेलोंच तर तुला कळवीन. मी सध्यां दु:खी आहे. तू मोठें पत्र पाठव. मला आनंदवील, सुखवील असें पत्र पाठव. किती तरी दिवसांत आपण एकमेकांना पत्रें लिहिलीं नाहींत. परंतु स्मृति अखंड असतेच.

अशा अर्थाचे पत्र रंगानें पंढरीला पाठवलें. थोड्या दिवसांनी भला मोठा लखोटा पेशावरच्या बाजूनें आला. पंढरीचा होता तो. लांबलचक होतें पत्र. रंगानें फोडलें. आणि तें सुंदर, सविस्तर पत्र तो बराच वेळ वाचित बसला. तें पत्र वर्णनात्मक होतें. कथात्मक होतें. त्यांत भावनांचा ओलावा होता. आपण सारेंच वाचूं या :

- वंदे मातरम् -

प्रिय रंगा
तुझें दु:खी पत्र पाहून मी अस्वस्थ झालों. तुझा एक आधार गेला. इतके दिवस तो पुरला याबद्दलच कृतज्ञ रहा. पुढें तो उरला नाहीं म्हणून दु:ख नको करुं. वासुकाकांचे जीवन म्हणजे यज्ञरुप होतें. ते तुला नव्हते वाढवित. ते एका ध्येयाला वाढवित हाते. तुझ्यामध्यें ते नवभारताचा आत्मा बघत.

मी या बाजूला आहें. कधीं वेळ असला म्हणजे दूर जातों. बर्फाच्छादित शिखरें दिसतात. किती आनंद होतो सांगू. सूर्याचे किरण त्यांच्यावर पडले तर चांदीच्या फुलपात्रांत लालपिंवळीं फुले ठेवावीं तसें दिसतें.

तूं मला काढून दिलेलें भारतमातेचें चित्र माझ्या खोलींत टांगलेलें आहे. अनेकांना ते आवडलें. ''कोण हा चित्रकार ?'' मला विचारतात.

''माझ्या बाळपणाचा मित्र रंगा'' असें मी अभिमानानें म्हणतों.

« PreviousChapter ListNext »