Bookstruck

सुनंदाची तपश्चर्या 4

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''थोडें दूध घेत जा. घेशील उद्यांपासून ? मला कोण आहे आई ? तूंहि का मला सोडून जाऊं इच्छितेस ? रंगासाठीं रहावें असें नाहीं तुला वाटत ? तुम्ही सर्वांनी माझ्यासाठीं श्रमून श्रमून जायचें. आणि मी जगायचें. काय त्या जगण्यांत आनंद ? आई, माझ्या मनाचा, भावनांचा कांही विचार कर. तूं जग. रंगाची कीर्ति ऐकायला जग. उद्यां माझें यश कोणाजवळ सांगूं, कोणाला ऐकवूं ?''

''रंगा, नको दु:खी होऊं. तुझ्यासाठीं मी जगेन. सारें करीन.''
सायंकाळीं रंगा त्या शिक्षकांकडे गेला. बराच वेळ ते बोलत होते.

''मला ड्रॉइंग टीचर परीक्षेचें सर्टिफिकिट नाहीं. शाळा मला नोकरी कशी देऊं शकेल ?''

''अरे नंदलालांजवळ तूं शिकला आहेस. त्यांचे प्रशस्तिपत्र आहे. याहून मोठी परीक्षा कोणती ? मी मुख्य शिक्षकांजवळ बोललों आहे. ते तुला नोकरी देतील.''

रंगाला त्या शाळेंत नोकरी मिळाली. सुनंदाला तो आतां कामधाम करुं देत नसें. शाळेंतहि तो मुलांत प्रिय झाला. विद्यार्थ्यांना नवीन नवीन कल्पना देई. त्यांच्याकडून सुंदर चित्रें काढून घेई.

परंतु ड्रॉइंगचे इन्स्पेक्टर आले. त्यांनी त्याच्या नेमणुकीला आक्षेप घेतला.

''ते नंदलाल वगैरे आम्ही ओळखीत नाही. मुंबईच्या परीक्षेचें आहे का सर्टिफिकिट ?''

''नंदलालांना ओळखीत नाहीं म्हणणारा ड्राँइंगचा इन्स्पेक्टर म्हणून येतो हें देशाचें दुर्दैव'' असें रंगा म्हणाला.

''इन्स्पेक्टराचा अपमान नका करुं''
''इन्स्पेक्टरानींहि भारताला भूषण झालेल्या थोरांचा अपमान करुं नये.''  बोलाचाली झाली. सरकारी पत्रव्यवहार सुरु झाला. शेवटीं रंगाची नोकरी गेली. सरकारी प्रशस्तिपत्र असेल तरच पात्रता. कितीहि ज्ञानसंपन्न, कलासंपन्न खादी व्यक्ति असली, परंतु जर हें प्रशस्तिपत्र नसेल, सरकारमान्य प्रशस्तिपत्र नसेल तर सारें फुकट.

रंगा बेकार झाला. घर गहाण होतें. कर्ज झालें होतें. नोकरीचाकरीहि नाही. रंगा चिंतेंत होता.

''आई, मी मुंबईला जातों. उद्योगधंदा बघतो. तेथें चित्रकार लागतात. वर्तमानपत्रें मासिकें असतात. बघेन कोठेंतरी काम. फावल्या वेळांत ध्येयवाद. इतर वेळां धंदा''

« PreviousChapter ListNext »