Bookstruck

मुंबईस 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

रंगाला पुन्हां पूर्वीच्या खोलींत जागा मिळाली. तेथें त्याच्या ओळखीचे कांही लोक होते. कोणी नवीन होते. ती खोली म्हणजे धर्मशाळा होती. ज्यांचे अभ्यासक्रम संपत ते जात, नवीन ओळखीचे दुसरे विद्यार्थी येत. असें चाले.

''रंगा, तूं चित्रकलेची येथील परीक्षा कां नाहीं देत ?''

''आतां परीक्षा नको. नंदलालांजवळ शिकून आल्यावरहि येथें चित्रकलेच्या शिक्षकाची परीक्षा देत बसूं ? मी ही गोष्ट सहन नाहीं करुं शकत.''

''परंतु व्यवहार नको का बघायला ? जीवनाला मर्यादा असतात. कांही तरी एक प्रमाण ठेवावें लागतें, ठरवावें लागतें. उद्यां जर सारेच असें म्हणूं लागले तर ? माझ्याजवळ आहे कला, मी कशाला परीक्षा देत बसूं असें का सर्वांनी म्हणायचें. तुम्हांला परीक्षा जड नाहीं. हातचा मळ. पहिला येशील. बघ विचार करुन.''

''आतां पुन्हा तेथें नांव घालणें नको. माझें मन नाहीं घेत.''

खोलींतील जुन्या मित्राजवळ बोलणें चाललें होतें. कामाची मंडळी हळुहळू सारी गेली. रंगाहि कांही वेळानें बाहेर पडला. त्यानें आपले नमुने बरोबर घेतले होते. आज अनेक ठिकाणीं कांही काम मिळतें का म्हणून बघायला तो हिंडणार होता. एका चित्रकलासंस्थेंत त्याला नोकरी मिळाली.

''आम्ही अनेक वृत्तपत्रांची, खास अंकांची मागणी पुरी पाडित असतों. प्रकाशकांना पुस्तकांसाठींहि चित्रें हवीं असतात. आम्ही तुम्हांला सांगूं त्याप्रमाणें तुम्ही नमुने करुन द्यायचे. कबूल ?''

''मी मधून मधून सूचना केल्या तर चालतील ना ?''
''अवश्य करा. परंतु शेवटीं निर्णय घेणें आमच्या हातीं. आम्ही व्यवहारी माणसें.''
''व्यवहारांतहि सुंदरता नि उदात्तता आणायला हवी ना ?''
''परंतु गिर्‍हाइकाला ती नको असेल तर ? मासिकांच्या मुखपृष्ठावर ठराविक चित्रंच लागत असतात. मागणी तशी पुरवठा.''

« PreviousChapter ListNext »