Bookstruck

मुंबईस 4

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

तो वाटी घेऊन गेला. नयना तेथील डबे शोधीत होती. एका डब्यांत भाजणीचें पीठ होतें. तिनें थालीपीठ लावायचें ठरविलें. तिनें भाजणी भिजवली. तिखट मीठ घालून तयारीनें राहिली. भात शिजला. तिनें तवा वर ठेवला. परंतु रंगा कोठें गेला ? का पळून गेला मला येथें ठेवून ? असें कसें करील तो ? तिला हंसूं आलें. तव्यावर थापून चुलीवर ठेवून ती रंगाचीं चित्रें पहात बसली. भिंतीवर एक चित्र होतें. ताईला भेट असें त्या चित्राखालीं लिहिलेलें होतें. ही कोण ताई ? रंगाला बहीण तर नव्हती. ती विचार करित होती. त्याची चित्रशाळा तपाशीत होती.

तिकडे रंगा आला. त्यानें तवा उतरला. चुर् आवाज झाला. नयना झटकन् आली.
''केव्हां रे चोरपावलांनी आलास ?''
''तूं कशी चोरपावलांनीं येऊन उभी राहिली होतीस ? तुम्हां बायकांनाच चोर होतां येतें असें नाहीं. पुरुषांनाहि होतां येतें''

''सारी सृष्टिच चोर आहे.''
''एकदम सृष्टिवर कशाला शेरा ? स्वत:पुरतें बघावें. आपण कोण तें बघावें.''
''स्वत:पुरतें बघावें हेंच का वासुकाकांजवळ शिकलास ? ते तर दुसर्‍याचें आधीं बघत. स्वत:चें विसरत.''

''नयना, दुसर्‍यांचा विचार तरी कां करायचा ? स्वत:चा आत्मा मोठा व्हावा म्हणूनच ना ? शेवटीं नि:स्वार्थ होणें म्हणजे परमार्थ मिळविणें.''
''जाऊं दे चर्चा. थालीपीठ बघ. तें जळेल.''
''तूं ना सारें करणार आहेस ?''
''तर मग तूं दूर हो.''
''तुला भाजणी सांपडली तर ? संन्याशाचा संसार असा तपासूं नये. अब्रु चव्हाट्यावर यायची. एक आहे तों एक नाहीं. येथलें कांही खाल्लें नाहींस ना ?''

''काय आहे खायला ? शंकरपाळे, लाडू, चकल्या ?''
''हे पदार्थ मी कोठून आणूं ?''
''मी देऊं आणून ?''
''नको. मला त्यांची फारशी रुचि नाहीं. परंतु येथें एका डब्यांत दाणे आहेत.''
''माझ्या वडिलांना फार आवडतात.''
''सातारकडची मंडळी शेंगाखाऊ.''
''आणि तुम्ही काय खाऊ ?''
''मिळेल-तें-खाऊ !''

« PreviousChapter ListNext »