Bookstruck

मुंबईस 6

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''मग कधीं पत्र नाहीं लिहिलेंस तें ?''
''लिहीत असें, परंतु पोस्टांत टाकित नसे.''
''मग कोठें कचर्‍याच्या पेटींत टाकीत असस ?''
''माझ्या ट्रंकेंतच तीं असत.''
''आतां कोठें आहेत ?''
''हृदयाच्या पेटींत.''
''त्या पेटीची किल्ली कोठें मिळते ?''
''ते सांगावें लागत नाहीं. त्या किल्लीचा पत्ता सर्वांना माहीत असतो.''
''नयना, तुला उशीर होईला जायला.''
''मला उशीर होईल म्हणून मामींना सांगून आलें आहे.''
''भात संपला, थालीपीठ संपलें. आतां काय खायचें ? हें दही संपव ना.''
''तूंच संपव. मी रोज खातेंच दहीं. रंगा, तूं घेतोस का कधीं दहीं ? तूं असा कां राहतोस ?''

''आईला. सुनंदा आईला कर्ज आहे. घर गहाण आहे. काकांचे घर. मला तें सारें मोकळें करायचें आहे. नयना, मी पोटभर जेवतों. उपाशी थोडाच असतों.''

''रंगा, आज तुला कांही विचारण्यासाठीं मी आलें होतें.''
''काय बरें ?''
''माझ्या बाबांच्या मोठ्यामोठ्या राजेरजवाड्यांशी ओळखी आहेत. मोठमोठे सरकारी अधिकारीहि परिचयाचे. दिल्लीचा व्हाइसरायांचा बंगला आहे ना ? तेथें अनेक चित्रकारांना काम मिळालं आहे. बाबा तुलाहि तेथें काम देतील मिळवून. तुला एकदम कीर्ति मिळेल. मग मोठमोठे राजेमहाराजे तुला बोलावतील. तूं होय म्हण. तुझी कला मागें पडून न राहो. एकदम माझा रंगा दिल्लीचा सम्राट होवो.''

रंगा विचारमग्न होता. दोघें मुकीं होतीं.
''सांग ना रंगा !''
''नको, नयना नको. ही खोली दिल्लीच्या राजवाड्याहून मला प्रिय आहे. येथें मी मोकळा आहें, स्वतंत्र आहे.''

« PreviousChapter ListNext »