Bookstruck

मुंबईस 8

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''मग मला कशाला श्रीमंत करतेस ?''
''रंगा, बाबा आपली मुलगी गरिबाला देणार नाहींत. तूं श्रीमंत हो. मग तुझ्या हातांत ते माझा हात देतील. म्हणून मी बाबांना म्हटलें कीं एका उत्तम चित्रकाराला द्याल का संधि ? म्हणून मी तुला विचारलें. रंगा, जा ना दिल्लीस !''

''तुझें माझ्यावर प्रेम आहे तर माझ्याबरोबर दारिद्र्याचा वसा घे.''
''बाबा काय म्हणतील ?''
''प्रेमासाठी त्यांचा त्याग कर.''
''रंगा, जीवन इतकें साधें सुटसुटीत नाहीं. अनेक आंतडीं गुंतलेलीं असतात. घाव घाल कर तुकडे असें नाहीं करता कामा. बाबांची मी एकुलती मुलगी. आईवेगळी मुलगी. त्यांचे माझ्यावर किती प्रेम ! ते मला लौकरच युरापांत नेणार आहेत. जगांतील सर्व चित्रशाळा बघून मी येईन. तूं येशील आमच्या बरोबर ?''

''नाही. दरिद्री चित्रकार कशाला बरोबर ?''
''माझें जीवन श्रीमंत करायला. माझ्या जीवनांत रंग भरायला.''
''सुनंदाआईंना सोडून मी कसा येऊं ? तें बरें नाहीं. नयना, तुला कांही वाटत असलें तरी तुझ्या वडिलांचे पैसे घेऊन येणें म्हणजे मिंधेपणाच. तुला माझ्याविषयीं वाटतें, तें त्यांना थोडेंच वाटेल ? तूं ये जाऊन. तुझी कला समृध्द करुन ये. मला तिकडचें ज्ञान दे.''

''माझा हात हातांत घे म्हणजे मिळेल.''
''परंतु दरिद्री रंगाच्या हातांत तुझा हात कोण देणार ?''
''तूं श्रीमंत हो.''
''तूं गरीब हो.''
''रंगा, गरीब हो गरीब हो म्हणतोस. अरे पत्नी उद्यां आई झाली म्हणजे आपलीं मुलें दारिद्र्यांत गारठावीं असें तिला वाटेल का ? मुलांना खाऊ द्यावा, खेळणीं द्यावीं, सुंदर आंगडीं त्यांना घालावीं असें नाहीं वाटत ? तूं माझें ऐंंक. तूं दिल्लीचा कलावान् हो. कीर्तिमान् हो. संपन्न हो. मग माझे बाबा नाहीं म्हणणार नाहींत. ही नयना तुझी आहे. तुझीच मग होईल. रंगा, म्हणना होय. दे ना रुकार !''

« PreviousChapter ListNext »