Bookstruck

ताईची भेट 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''लिली गेली वाटतें'' त्यानें विचारलें. तिच्या डोळ्यांतील उरल्यासुरल्या अश्रुंनीं उत्तर दिलें. त्यानें मुलीचा देह घेतला. तो बाहेर निघुन गेला. त्या मुलीच्या देहाची शेवटची व्यवस्था लावायला तो गेला.

ताई बसून होती. शेवटीं ती उठली. तिनें चूल पेटवून पिठलें भात करुन मग जमिनीवर आंग टाकलें. तिला कोठली खाण्याची इच्छा ? तिच्या सार्‍या इच्छा अस्तास गेल्या होत्या. परंतु पतीला जेवायला लागेल, आल्यावर पान वाढ म्हणायचा म्हणून त्या मातेने हंडी शिजवून ठेवली. लिलीचे कपडे हृदयाशीं धरुन ती पडली होती. देहाचें वस्त्र स्मशानांत गेलें. परंतु हीं वस्त्रें घरांत होतीं. तीं ताईच्या थंडगार जीवनाला ऊब देत होतीं.

सारें आटोपून तो आला. ती उठली. तिनें पाट ठेवला, पान वाढलें. तो मुकाट्यानें जेवला. पतीची गादी तिनें झटकून दिली. तो पडला. तीहि स्वयंपाक घरांत एक चटई टाकून पडली. अंधार, सारा अंधार. तिला मधून मधून रडूं येत होतें. काय हें जीवन असें तिला वाटलें.

परंतु कांही दिवस गेले. तिच्यांत आतां क्रान्ति दिसूं लागली. ती निर्भय, नि:स्पृह बनली. ती गरीब गोगलगाय राहिली नाहीं. ती तेजस्वी ज्वाला बनली. ती करुणमूर्ति आतां नव्हती. ती वज्राप्रमाणें कठोर बनली. ती अबला नाहीं राहिली, थरथरणारी वेल नाहीं राहिली. ती धैर्यमंडपाचा स्तंभ बनली.

''होतें की नव्हतें त्या पोरावर तुझें प्रेम ?'' त्या रंगार्‍यावर, त्या चितार्‍यावर ?''

''पुन्हां असें विचाराल तर याद राखा. अंगावर निखार ओतीन. तुम्हांला नीट जगायचं असेल तर असे बोलत जाऊं नका. आपल्या गांठी दुर्दैवानें पडल्या आहेत खर्‍या. दोन वेळां जेवा नि स्वस्थ रहा. नागिणीला डिवचूं नका. खबरदार कांही बोलाल तर.''

तो चकित झाला. तिच्याकडे तो बघत राहिला.

''दुर्दैवानें गांठी पडल्या याचा काय अर्थ ? याचा अर्थ हाच नाहीं का तुला त्याच्या प्रेमाचें, त्याच्याजवळ गुलगुल गोष्टी करण्याचें सुदैव हवें होतें ? बोल. खरें सांगायला काय जातें ? तूं एवढी धीट नि उर्मट होऊन बोलत आहेस तर या प्रश्नांचे उत्तर कां नाहीं देत ? सांगून टाक कीं होतें त्याच्यावर प्रेम''

« PreviousChapter ListNext »