Bookstruck

भारत-चित्रकला-धाम 12

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''ताई, निराश नका होऊं. रंगा बरा होईल. आनंदी असा.''
''मी स्टेशनवर येतें. तुम्हांला निरोप देतें. हे बरें असते तर स्वत:च आले असते.''
''भाऊचें काम बहीण पार पाडील'' पंढरी म्हणाला.

टांगा आला. ताई पंढरी टांग्यांत बसली. सुनंदा रंगा दारांत होतीं. गेला टांगा. रंगाला एकदम घेरी आली. सुनंदानें कसातरी आधार देऊन त्याला आंथरुणावर निजविलें. ती त्याच्याजवळ बसून राहिली. थोड्यावेळानें त्याने डोळे उघडले.

''बरें वाटतें आतां आई.''
''तू थकलास हो रंगा.''
स्टेशनांत गाडी आली. दुसर्‍या वर्गाच्या डब्यांत पंढरी बसला. ताईनें डबा बघितला.
''मी दुसर्‍या वर्गाचा डबा कधीं पाहिला नव्हता. पंखा आहे वाटतें.''
''साहेबाच्या डब्याला सारें असतें'' त्याने पंखा सुरु केला.
''तुमचा फोटो नाहीं एखादा ?''
''आहे. द्यायला विसरलोंच.''

त्यानें स्वत:चे दोनचार फोटो काढून दिले. नंतर खिशांतून एक फोटो त्यानें हळूच काढला. तो हातांत लपवून म्हणाला :

''यांत कोण असेल ओळखा.''
''एखादी सुंदर काश्मीरी नारी.''
त्या फोटोंत रंगा नि तो दोघे होते. तो लहानपणचा फोटो होता.

''हा असतो माझ्या जवळ नेहमी. आणि भारत मातेचा. रंगा नि भारतमाता. दोनच माझीं नातीं.''

गाडीची शिटी झाली.
''जपा, सुखरुप परत या'' ती म्हणाली.
''माझ्या रंगाला जपा'' तो म्हणाला.
ती खालीं उतरली. तो गाडींतून बघत होता. निघाली गाडी, गेली. ताई एकटीच पायीं चालत आली. घरीं सुनंदा रंगाजवळ होती.

« PreviousChapter ListNext »