Bookstruck

भारत-चित्रकला-धाम 16

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''मी रंगाला हवापालट करायला नेईन. तो बरा होईल. तो माझा आहे. मी दुसर्‍या कोणाची नाहीं. जगांत त्याची म्हणून जगेन, त्याची म्हणून मरेन. माझ्या जीवनावर त्याच्या मालकीचा अमर शिक्का असो. मी त्याच्या आत्म्याशीं जणूं लग्न लावित आहें. त्याच्यांतील कलेशीं, दिव्यत्वाशीं.''

''नयना, ही भाषा झाली. परंतु मनुष्य नेहमींच अशा भावनेंत नसतो.''
''खरं आहे आई. परंतु मी काय सांगूं ? तुम्ही नाहीं म्हणूं नका. रंगा बरा होईल.''

''बरा झाल्यावर मग बघूं.''
''नाहीं. तो स्वार्थ दिसेल. रंगा कसाहि असो. त्याची होईन तेव्हांच आतां माझ्या जीवनांत रंग. आज रात्रीं या आकाशाखाली तुम्हीं आमचें लग्न लावा. ताई साक्षीला. हे अनंत तारे साक्षीला.''

आणि सारें ठरलें. ताई जवळच्या म्युनिसिपल बागेंत रात्रीची गेली. तिनें दोन सुंदर माळा केल्या. पंढरीनें आणलेला गालिचा गच्चींत घालण्यांत आला. ताईनें रंगाला हळूच धरुन वर आणलें. जवळ नयना बसली. सुनंदानें दोघांचे हात मिळवले. दोघांनीं एकमेकांस हार घातले. ताईनें टाळी वाजवली.

''भाऊ, सुखी हो'' ती म्हणाली.
''ताई, आज तूं मला पुन्हां भाऊ म्हटलेंस.''
''आज सारीं ग्रहणें सुटलीं. आज मी आनंदी आहें.''

''नयना, मला क्षमा कर. तुझें पत्र मी फाडलें, फोटो मी फाडले. फाडल्यावर जुळवीत बसलें. मला क्षमा करा. मी एक अशान्त स्त्री आहें.''

ताई खाली निघून गेली. सुनंदा खालीं गेली.
''दमला असशील तूं. माझ्या मांडीवर डोकें ठेवून पड.'' नयना हळुवारपणें म्हणाली.

« PreviousChapter ListNext »