Bookstruck

रंगाचें निधन 3

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''मला त्यांचे मरण दिसतच नाहीं. मला अमर अशी त्यांची घवघवित अज अजित मूर्तिच सदैव दिसते. विश्वाच्या रंगानें रंगलेला रंगा मला दिसत असतो.''

''तुमचें बोलणेंहि मला समजत नाहीं. तुमची ताई एक अडाणी स्त्री आहे.''
''ताई चल. रंगाला कांही खायला द्यायला हवें.''

दोघीजणी गेल्या. त्यांनीं थोडा सांजा रंगासाठीं केला. नयनानें त्याला भरवला. तो पडूनच होता.

गाडीची वेळ झालीं. नयना निघाली. ती रंगापाशीं उभी होती. डोळे मिटून व त्याच्या अंगावर हात ठेवून उभी होती. ती का त्याच्या जीवनांत स्व:तचे प्राण ओतीत होती ? शेवटीं सद्गदित होऊन म्हणाली :

''तुला सोडून जातांना वेदना होतात. आतडें दूर करावें तसें वाटतें. रंगा, जाऊन येतें हां. मग आपण दूर दूर जाऊं.''

''आकाशांत, स्वर्गांत ?''
''आपला स्वर्ग जेथें आपण असू तेथें. तो दूर नाहीं. येथें मी उभी आहें. येथें मी स्वर्गसुखच अनुभवित आहें.''

''तूं काव्य-देवता आहेस.''
''तूं स्फूर्तिदाता. तूं रंगा-देवता आहेस, ध्येयमूर्ति आहेस. माझ्या देवा, माझ्या जीवना, मी येईपर्यंत नीट रहा.''

''लौकर ये. माझा काय भरंवसा ?''
''असें नको बोलूं.''
''तुझें माझ्या आत्म्यावर ना प्रेम  ? भीति कशाची ? माझें मरण तर मी समोर पहात आहे.''

सुनंदाताई शेवटीं म्हणाल्या :
''नयना गाडी चुकेल. नीघ आतां. असलीं बोलणींहि नकोत.''
''येतें रंगा, जपा सारीं.''

असें म्हणून नयना निघाली. पोंचवायला ताई गेली होती. बायकांच्या डब्यांत कोणी नव्हतें. नयना त्यांतच बसली. ती निर्भय स्त्री होती. युरोपांतून जाऊन आलेली.

« PreviousChapter ListNext »