Bookstruck

रंगाचें निधन 7

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

स्टेशनांत पहांटेची गाडी आली. नयना लगबगीनें उतरली. ती घरीं आली. ताई नि सुनंदा झोंपलेलीं होती. आश्चर्य म्हणजे दार उघडें होंतें ! नयनानें लोटलें तो उघडलें ! जणूं कोणी येणार या कल्पनेनेंच उघडें ठेवलें गेले. नयना आंत आली. सारें शान्त होतें. ताई, सुनंदा का रात्रभर जागरण करित होत्या ? आणि रंगा कोठें आहे ? कोठें आहे रंगा ? त्याची खाट रिकामीशी ? कोठें आहे रंगा ? तिचें हृदय चरकलें, मन थरकलें. ती वर गेली. गच्चींत जाऊन उभी राहिली. तों तेथें लोडाकार गादीवर डोकें ठेवून रंगा शान्त पडून होता. हातांत तो रंगानें रंगलेला कुंचला होता. समोर तें विश्वरुपदर्शन होतें. चित्रकाराचें विश्वरुपदर्शन !

परंतु तेथे हालचाल नव्हती. छातीचें खालींवर होणें नव्हतें. नयना जवळ बसली. तिनें रंगाचें मस्तक आपल्या मांडीवर घेतलें. ती डोळे मिटून बसली. थोड्या वेळानें तिनें डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलें. ''रंगा'' ती केविलवाणें बोलली. ती गंभीर झाली. तिनें त्याच्या मुखावर मुख ठेवलें. तिचें अश्रु त्या प्रसन्न शान्त मुखकमलावर घळघळले. तिनें पदरानें ते पुसले. त्या शान्त मुखचंद्राकडे ती बघत होती. संपलें का ते जीवन ? कोमेजलें का फूल ? ती डोळे मिटून बसली.

ताई नि सुनंदा उठून वर आल्या. तो तें गंभीर, हृदय विरघळवणारें दृश्य.
''केव्हां आलीस नयना ?'' ताईनें विचारलें.

''केव्हां ग आलीस ?'' सुनंदा म्हणाली.

''आई, ताई, खेळ संपला. ही चिरनिद्रा. विश्वमातेचा बाळ तिच्या घरीं गेला.''
''काय म्हणतेस ?''


''काय म्हणूं ? नाडी नाहीं. श्वास नाहीं. प्राणहंस निघून गेला.''
ताई धांवली. एका डॉक्टराला घेऊन आली.

''संपलें सारें'' डॉक्टर म्हणाले व गेले.

त्या तीन स्त्रिया तेथें अगतिकपणें बसल्या होत्या. आणि तें भव्य चित्र तेथें होतें. जीवनाचे शेवटचे रंग ओतून निर्माण केलेलें अमर चित्र ! नयना खाली वाकून म्हणाली : ''रंगा, तुला न्यायला आलें तर देवानेंच आधीं तुला नेलें. शेवटचे शब्दहि आपण बोललों नाहीं. रंगा, माणसाचा काय भरंवसा असें मी जातांना तू म्हणालास. ती का भविष्यवाणी होती ? रंगा रे, कां असा गेलास ? कां ?''

« PreviousChapter ListNext »