Bookstruck

स्वातंत्र्याच्या युध्दांत 4

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''जो देतो तो नेतो. आपली कशावर आहे सत्ता ? म्हणून नाशिवंताचा शोक करुं नये. जें अविनाशी आहे तें कोण नेणार ?''

''तें अविनाशी साकार पहाण्यांतच मनाला समाधान वाटतें. मी लहान आहें आई; कोठून आणूं आध्यात्मिक समाधान ?''

शोकावेग ओसरला. सर्वांची जेवणें झालीं. एकदोन दिवस असेच गेले. नंतर त्या पारशी मातेकडे नयना गेली. तिची त्यांची जणूं शतजन्मांची ओळख. तिला तें घर आवडलें. तेथील वातावरण आवडलें. मणीची आई तिला एक खोली देणार होती. मणीला शिकवावें, रहावें. काय द्यायचें घ्यायचें तेंहि ठरलें.

''तुम्हांला घरीं पाठवायला लागेल तें मागत जा. पन्नास लागोत, दोनशें लागोत'' मणीची आई म्हणाली.

नयना बापुसाहेबांकडे आली. तिनें सारी हकीगत सांगितली. जाऊं का म्हणून तिनें विचारलें.

''कांही हरकत नाहीं. तेथें राहणें नको वाटलें तर हें घर आहेच. केव्हांहि या. ही मुंबई आहे. जपून रहा;  नानाप्रकारचीं नाना माणसें. आपण विश्वासानें चालतों. परंतु कधीं संकटातहि येतो. रंगाला सारे अनुभव आले होते. लहानशा वयांत त्यानें किती भोगलें, किती अनुभवलें.''

''म्हणूनच तो लौकर गेला.''
नयना मणीकडे रहायला आली. मणी अक्षै तिच्या खोलींत असायची. नयना तिला सारें शिकवी. चित्रकला विशेष विषय म्हणून शिकवी. कधीं मणीबरोबर ती फिरायला जाई. मणी समुद्राला हात जोडी. नयनाहि जोडी.

''तुमचा का आमचा धर्म ?''
''आमचा धर्म सर्वांशीं अविरोधी आहे. प्रभु सर्वत्र आहे असें आम्ही मानतों. नदी पाहून, दिवा पाहूनहि नमस्कार करणारे, समुद्र पाहून, सूर्य पाहून का नमस्कार करणार नाहींत ? आम्हीहि अग्नीची उपासना करतों. हे अग्ने, आम्हांला यश दे, पापांतून पलीकडे ने असे मंत्र आहेत. माझे बाबा म्हणतात.''

''कोठें आहेत बाबा ?''
''तिकडे लांब.''
''ते तुम्हांला पत्र नाहीं लिहीत ?''
''ते माझ्यावर रागावले आहेत.''
''माझे बाबा थोडा वेळ रागावले तरी पुन्हां मला जवळ घेतात.''
''तूं दैवाची आहेस. चल आतां घरीं.''

« PreviousChapter ListNext »