Bookstruck

स्वातंत्र्याच्या युध्दांत 9

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

मोटार निघाली. परंतु नयना खिन्न होती, दु:खी होती.
''तुम्ही मुंबईला येतांना आमच्याकडे ?''
''नाहीं; मला घरीं गेलें पाहिजे. वडील आजारी आहेत. ते मरणशय्येवर आहेत.''
''अरेरे.''
पुण्याच्या स्टेशनवर मणि नि नयना, दोघी उभ्या होत्या.

''पत्र लिही नयना.''
''होय मणी''
''मी तुझ्याबरोबर येऊं ?''
''मी भित्री नाहीं.''
''तरीहि अशा वेळेस कोणी जवळ असावें असें वाटतें.''
''मला वाटलें तर मी बोलावीन.''
''ठीक तर.''
नयना सातारकडे गेली. मणि नि तिची आई मुंबईला. गाडींत नयना विचारमग्न होती. पित्याचें शेवटचें दर्शन तरी होईल कीं नाहीं ? किती प्रेमानें त्यांनी वाढवलें. सार्‍या आठवणी येत होत्या. ती घरीं आली. त्या मोठ्या वाड्यांत शान्तता होती. हलकेच ती घरांत शिरली. सकाळची वेळ होती. घरांत दूरची एक आजीबाई होती.

''आजी, बाबांचे कसें ?''
''आलीस तूं ? तुझ्यासाठी कंठी प्राण धरुन आहेत.''
नयना वडिलांच्या शयनागारांत गेली. तो वृध्द पिता तेथें नयनाची नि मृत्यूची वाट पहात पडून होता. ती पित्याजवळ बसली. तिनें हळूच हांक मारली.

''बाबा, मी आलें आहे. मी सुटलें.''
''मलाहि आतां सुटूं दे'' डोळे उघडून म्हणाले.
''मी तुमच्यासाठीं काय करुं ?''
''आतां कांही करायचें राहिलें नाहीं. वर्तमानपत्रांत तुझा पति गेल्याचें वाचलें. मला किती दु:ख झालें असेल ? नयना, जाणूनबुजून तूं दु:खाच्या डोहांत उडी घेतलीस. आणि मीहि तुला वेळेवर मदत दिली नाहीं. मीहि अपराधी. माझें मन मला खातें. तुम्ही मुलीला विधवा केलेंत तूं म्हणालीस. क्षमा कर पित्याला. त्याचें मरण इतक्या जवळ असेल याची मला काय बरें कल्पना ? तूं मला नंतर कधीं पत्रहि लिहिलें नाहींस. तुरुंगांत गेल्यावर लिहिलेंस. असो. आज तूं पुन्हां प्रेमानें पित्याजवळ आलीस. दुरावलेलीं पितापुत्रीचीं हृदयें पुन्हां जवळ आलीं. मला सारें मिळालें बाळं. तूं सारें जीवन कसें कंठणार ?''

« PreviousChapter ListNext »