Bookstruck

स्वातंत्र्याच्या युध्दांत 12

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''आजी, आज मी जातें'' नयना म्हणाली.
''मी येथें एकटी कशी राहूं ?''
''भय्या आहे. मी लौकरच येईन. सुनंदा, ताई, यांना घेऊन येईन. आतां भारतचित्रकलाधाम येथेंच सुरु करुं.''

''तुला योग्य तें तूं कर. मला आधार दे म्हणजे झालं.''
''मी तुला दूर कशी लोटीन ? बाबांचे तूंच तर सारें केलेंस.''
मणि आणि नयना निघालीं. मुंबईस मणीकडे एक दिवस राहून नयना दुधगांवला आली. सुनंदा आईनें तिला पोटाशीं घेतलें.

''आई, जागांत मला कोणी नाहीं. जन्म देणारी आई लहानपणींच गेली. जीवनाचा अर्थ देणारा रंगा लगेच गेला. ज्यानें वाढवलें ते बाबा गेले.''

''मी आहें तुला, ताई आहे; सर्वांच्या प्रेमळ स्मृति आहेत. रंगाचीं चित्रें आहेत. ध्येयें आहेत. सभोंवतालचा समाज आहे. नयना, आपण कधींच एकटीं नसतों. मनांत डोकावून बघ. तेथें रंगा आहे. खरें ना ? मनुष्याचा हाच मोठेपणा आहे कीं तो एकटा असून अनेकांचा होतो,  अनन्ताचा होतो, विश्वाचा होतो.''

''आई तुम्ही कोठल्या शाळेंत असें बोलायला शिकल्यात ?''
''रंगाच्या वासुकाकांच्या. त्यांची थोर शिकवण. नयना, मला तरी कोण आहे ? परंतु मी तुम्हां सर्वांची आहें. आजुबाजूच्या शेजार्‍यांची आहें. तूं कलावान् तूं नुसते चित्रांतच रंग भरणारी नाहींस. अनेकांच्या जीवनांतहि रंग भरायचे असतात. तें चित्र कशासाठीं ? दुसर्‍यांना आनंद देण्यासाठीं, त्यांच्या हृदयाला पोंचण्यासाठी. खरेंना ? तुझीं चित्रें विश्वाच्या जीवनांत रंग ओततील. रंगा म्हणे, 'माझें चित्र एखादा अमेरिकन घेईल. तेथील बंधुभगिनी माझें चित्र पाहतील. त्यांचा आत्मा भारताशीं बोलेल. माझें चित्र जगाला एकत्र आणील. पौर्वात्य पाश्चिमात्य हृदयें जोडील. केवळ पूर्व, केवळ पश्चिम असेंनाहीं. मानवी हृदय, मानवी आत्मा एकच आहे.'

''आई, बोला.''
''त्यांच्या सारखें का मला सांगतां येणार आहे ? ते गच्चींत बसत. रंगाला भारतीय प्रसंग सांगत. याच्यावर चित्र काढ म्हणत, विवरण करीत. ती अमृतवाणी होती. मी त्या वाणीची वेडीवांकडी पलेट.''

''वेडीवांकडी मुरली, परंतु विश्वाला रमविते.''

« PreviousChapter ListNext »