Bookstruck

भारताची दिगंत कीर्ति 5

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List

''नयना, आज रंगा असता तर ?''
''अरे तो का दूर आहे ? येथील अणूरेणूंत तो आहे. नयना कधींच मेली. नयनाच्या रुपानें तोच आहे. हीं त्याचीं बोटें, हे त्याचे डोळे'' असें म्हणून तिनें डोळे मिटले. पंढरी, ताई गंभीरपणें तेथून उठून गेलीं.

सायंकाळीं आज नयनानें रामरायाची पूजा केली, आरती केली. सुनंदा, ताई, पंढरी, मणि इतर मंडळी आहेत. नयनाचें तोंड दिव्य तेजानें फुललें होतें.

ती भावोन्मत्त झाली. प्रभुमय, ध्येयमय भारतमय झाली. ती नदीतटाकीं जाऊन बसली. कोणी तरी आलें. पाठीमागून डोळे धरले.

''रंगा सोड डोळे. तूं का निराळा आहेस ?'' ती म्हणाली. डोळे सुटले. कोण होतें तेथें ?

''लता ?''
''होय नयना.''
''केव्हां आलीस ?''
''आरतीच्या वेळेसच आलें. नयना, मी तुझ्या संस्थेंतील तुझी पहिली विद्यार्थिनी.''
''मी दुसरी'' मणि येऊन म्हणाली.
''आयेषा येणार आहे हॅरिस साहेबांची'' लता म्हणाली.
''या, या, सार्‍याजणी या. भारताचीं सारीं मुलें मुली येवोत. दिगंतांतील विद्यार्थी येवोत. येथें छोटी विश्वभारती करुं. गुरुदेवांची महान् विश्वभारती. ही आपली छोटी.''

ताई, पंढरी, सुनंदा आई सारीं इकडेच आलीं. नदी वहात होती. मंद वारा वहात होता. आकाश फुललें होतें. सारीं बोलत होती. रंगाच्या कथा, वासुकाकांच्या, सर्वांच्या. सर्वांचे कृतज्ञतेनें स्मरण करण्यांत येत होतें. जणुं श्राध्द केलें जात होतें. मधून डोळ्यांतून अश्रु येत. तर्पण होई.

''ऊठ नयना'' मणि म्हणाली.
''ऊठ रंगा'' ताई म्हणाली.
''ती का रंगा ? लतेनें हंसून म्हटलें.
''होय. या एका देहांत दोन आत्मे, दोन हृदयें, दोन मनें एकरुप होऊन आहेत. रंगा अमर आहे.'' सुनंदा आई गंभीरपणें म्हणाली,

''होय रंगा अमर आहे, भारत अमर आहे.'' सारीं आनंदानें गर्जलीं.

जय हिंद

« PreviousChapter List