Bookstruck

मातीची दर्पोक्ति

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

घनधार मृगाचा प्राशुनिया पर्जन्य

त्या तृषार्त भूवर आले नव चैतन्य,

उन्माद चढे, तो दर्प दर्वळे भोती

थरथरा कापली वर दर्भाची पाती

ते सुस्त धूलिकण गाउ लागले गीत

कोलाहल घुमला चहूकडे रानात-

अभिमानी मानव ! आम्हाला अवमानी !

बेहोष पाउले पडती अमुच्यावरुनी

त्या मत्त पदांना नच जाणीव अजूनी

की मार्ग शेवटी सर्व मातिला मिळती

मातीवर चढणे एक नवा थर अंती !

दर्पणी पाहु द्या रमणि रूप दर्पात

वा बाहू स्फुरु द्या बलशाली समरात

पांडित्य मांडु द्या शब्दांचा आकांत

ते रूप, बुद्धि ती, शक्ति, आमुची भरती,

मातीवर चढणे एक नवा थर अंती !

कित्येक शिकंदर जग जिंकुनिया गेले

कित्येक वाल्मिकी अखेर इकडे आले

कित्येक मनू अन् मुनी धुळीने गिळले

स्मृतितीलहि त्यांच्या ओळी अंधुक होती

मातीवर चढणे एक नवा थर अंती !

पाहून हासु ये तुमचे ताजमहाल

अन् गर्व किती तो ! काल काय जिंकाल ?

शेकडो ताजही जिथे शोभले काल

ती प्रचंड नगरे आज आमुच्या पोटी

मातीवर चढणे एक नवा थर अंती !

धनवंत असू द्या, असु द्या दीन भिकारी

कुणि संत असू द्या वा पापी व्यभिचारी

इकडेच वाहते सर्वांची रहदारी

हो भस्म चितेवर सारी नीति-अनीति

मातीवर चढणे एक नवा थर अंती !

मरणोत्तर वाटे होइल आशापूर्ति

स्वर्गीय मंदिरें घ्यायाला विश्रांति

लाभेल प्रभूची वा प्रमदांची प्रीति

त्या व्याकुल मतिला इथेच अंतिम शांती

मातीवर चढणे एक नवा थर अंती !

ही क्षुद्र बाहुली कोण करी निर्माण ?

बेताल नाचवी, सूत्रधार हा कोण ?

मातीतच अंती त्याचेही निर्वाण ?

स्वामित्व जगाचे अखेर अमच्या हाती

मातीवर चढणे एक नवा थर अंती !

« PreviousChapter ListNext »