Bookstruck

यापरी असे जीवन

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

यापरी असे जीवनऽ सखे गे, चंचल अमुचे क्षण.

ते संध्यामेघावरी

चमकती किरण पळभरी,

परि जाति कुणिकडे सांग आम्हांला चटका ते लावुन ?

यापरी असे जीवनऽ सखे, अम्हि मोह घालतों पण.

घनराइमधें कवडसा

तरु हलतां डुलतो कसा !

परि जाइ कुणिकडे सांग सखे, रवि कलतां स्थानांतुन ?

यापरी असे जीवनऽ सखे, अम्हि हलतों डुलतों पण.

दलदलीमधें ज्योति ती

बहुवर्णिं ठुमकते किती !

ती निजते उठते, सांग कुणिकडे जाइ गुप्त होउन ?

यापरी असे जीवनऽ सखे, अम्हि नटतों थटतों पण.

घनपटल क्षण भेदुन

ये ज्ञानकिरण तेथुन;

तो दिसेचि, न दिसे पुन्हा, नभाला तम टाकी व्यापुन.

यापरी असे जीवनऽ सखे, त्यावरी भरवसा पण.

तेजाच्या ज्या सागरीं

लीन तेज कथिलें वरी

जायचें अम्हां त्या घरीं तरि न बघुं असुनि अम्हां लोचन

यापरी असे जीवनऽ परि सदा ठेव म्हणुन लोचन.

« PreviousChapter ListNext »