Bookstruck

गुराख्याचें गाणें

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

कुरणावरती वडाखालती गाइ वळत बैसतों

स्फटिकापरि निर्मळ हा खळखळ झरा जवळ वाहतो.

पावा फुंकुनि मंजुळ नादें रान भरुनि टाकितों,

आनंदानें डोळे भरतां प्रभुजीला प्रार्थितों.

गाईंमागें रानोमाळीं शीळ भरत हिंडतों,

दर्‍यादर्‍यांतुनि रान-ओहळावरी मौज मारितों.

उन्हाची भीती कवणाला ?

पाउस काय करिल मजला ?

भितों मी कोठे थंडीला ?

श्रीमंतापरि गरिबा कोठे वारा तो दुखवितो ?

देवाजीवरि सदा हवाला टाकुनि मी राहतों.

तृषा लागतां नीर झर्‍याचें ओंजळिनें मी पितों,

क्षुधा लागतां कांदाभाकर यथेच्छ मी जेवितों.

फिरतां फिरतां करवंदें हीं तोडुनि मी भक्षितों,

काठीनें मी कांटे दाबुनि बोरेंहि तोडितों.

धनिका ताट रुप्यांचें जरी,

पांचहि पक्वान्नें त्यावरी,

नाहीं गोडि मुखाला परी.

गाईंसंगें हिंडुनि रानीं थकुनि सुखें जेवितों,

जाडें भरडें खाउनि धनिकाहूनि अधिक तोषतों.

पुच्छ उभारुनि थवा गाइंचा ज्या वेळीं नाचतो,

मोरमुगुटबन्सीवाल्यापरि उभा मौज पाहतों.

ओहळावरी थवा तयांचा पाणी जेव्हां पितो,

उभा राहुनी प्रेमें त्यांना शीळ अहा घालितों !

कशाला मंदिल मज भरजरी ?

घोंगडी अवडे काळी शिरीं,

दंड करिं गाइ राखण्या, परी

कुवासना घालिति धिंगा तो महाल मी टाकितो

गाईंसंगें हवेंत ताज्या नित्यचि मी राहतों.

क्रोध, काम, मद, मत्सर यांही गांव सदा गर्जतो

दूर टाकुनी त्यांस शांतिनें सुखें दिवस लोटितों.

समाधान हा परिस अहा ! मज रानांतचि लाभतो,

दुःखाच्या लोहास लावितां सुखसोनें बनवितो.

चढल्या पडावयाची भिती;

गरिबा अहंकृती काय ती ?

काय करि त्याचें खोटी स्तुती ?

परवशतेच्या बिड्या रुप्याच्या पायांत न बांधितों,

निजं ह्रदयाचा धनी धरणिचें धनित्व अवमानितों.

« PreviousChapter ListNext »