Bookstruck

तीनी सांजा सखे, मिळाल्या

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

तीनी सांजा सखे, मिळाल्या, देई वचन तुला

आजपासुनी जिवें अधिक तूं माझ्या ह्रदयाला.

कनकगोल हा मरीचिमाली जोडी जो सुयशा,

चक्रवाल हें पवित्र, ये जी शांत गभीर निशा,

त्रिलोकगामी मारुत, तैशा निर्मल दाहि दिशा-

साक्षी ऐसे अमर करुनि हे तव कर करिं धरिला.

स्वकरें तरुवर फुलें उधळिती, प्रीति-अक्षता या;

मंत्रपाठ हा झुळुझुळु गातो निर्झर या कार्या;

मंगलाष्टकें गाति पांखरें मंजुळ या समया;

सहस्त्रकर दिनकर हा स्वकरें उधळि गुलालाला.

नाद जसा वेणूंत, रस जसा सुंदर कवनांत,

गंध जसा सुमनांत, रस जसा बघ या द्राक्षांत,

पाणि जसें मोत्यांत, मनोहर वर्ण सुवर्णांत,

ह्रदयी मी सांठवीं तुज जसा जीवित जों मजला.

« PreviousChapter ListNext »