Bookstruck

तूं जिवलगे विद्यावती जाणती !

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

नाहीं ज्या सुमनीं मधू, न घिरट्या घे भृंग गुंगोनिया,

सौंदर्यातिशयें खुलो, परिमळें व्यापूनि टाको वन;

नाहीं प्रीति अशा सुरम्य नयनीं गुंते न माझें मन,

सौंदर्यातिशयें खुलो, जन झुलो त्यालागि पाहोनिया.

जीं नेत्रें प्रणयाश्रुपूरित तिथे मच्चित्त पावे लया,

नेत्रांची अनुरक्तता झकमके अश्रूंतुनी लाडके,

प्रातःस्नान दंवें मनोहर अशा पुष्पामधें कौतुकें

गुंतोनी रसिकाग्रणी मधु पितो तो भृंग गुंगोनिया.

नानावणिं विचित्र पुष्प नटलें गर्वे अफूचे जरी

'मोही घालिन भृंग' हें चघळतें मांडे मनाचे किती

जाणे तो भरलें जलाल गरलें कीं पुष्प हें अंतरीं,

पाही ढुंकुनिया कधी तरि तया कीं काय तो सन्मती ?

'कां मी आवडतें ?' म्हणोनि पुसशी कां गे मला सुंदरी ?

सांगावें तुज काय ? तूं जिवलगे, विद्यावती, जाणती

« PreviousChapter ListNext »