Bookstruck

आठवती ते दिन अजुनी

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

आठवती ते दिन अजुनी. ध्रु०

खळखळ गळतें जळ नयनांतुनि येतें माझें उर भरुनी. १

अलसकुंचित तें मदिरेक्षण, लज्जास्मित तें मधुवदनीं, २

मृदुमधु बोलुनि नेली यामिनि जागत कामिनि, ये स्मरणीं. ३

करिं कर घालुनि अधिकचि अवळुनि तृप्त न झालों जैं स्वमनी. ४

कोमल अधरीं दाबुनि अधरा जेव्हां रमलों सुखसदनीं ५

लीलावति ती सुदती युवती स्मृति ती करिते स्थित नयनीं. ६

हाय काय परि आतां त्याचें ? मृगजळसम त्या दिनरजनी ! ७

स्वलोकांचे स्वप्नसुखांचें तैसें उरलें तें वचनीं. ८

अस्ताचलगत रविकर सुखकर ज्यापरि पांखरुं खिन्न गणी, ९

निर्मल दंवकण जैसे गेले धरितां धरितां ते उडुनी, १०

मधुतर जैसें रमणीकूजन चोरुनि रमणाच्या श्रवणीं, ११

प्रियकरचुंबन जेवि बळें कृत फिरवित असतां मुख तरुणी, १२

जैशी अद्‌भुत धुंदपणाचे प्रथमालिंगनिं ज्योति मनीं, १३

हा ! आक्रंदन गगनहि भेदुन गेलें तरि तें विफल जनीं ! १४

हा धिग् जीवन ! मृत्युच हे दिन आले भाळीं मम कुठुनी ? १५

« PreviousChapter ListNext »