Bookstruck

गतकाल

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

मध्यरात्रिच्या निवांत समयीं रे माझ्या ह्रदया,

गत घटिकांतुनि किती भटकशिल सांग अतां सखया.

गतकाळाचें श्मशान यापरि जागवितां घटिका

भुतें जागतिल, मुखें वासतिल, खेळ परी लटिका.

निज निधनीं निधनातें नेलीं आशांसह रत्‍नें,

वदनीं त्यांच्या दिसोत; मिळतिल काय अशा यत्‍नें ?

सस्मित वदनें, धवल दंतही, कुरळ केश भालीं;

मधुर मनोरम नयन, विकसली गालांवर लाली.

प्राणाहुनिही प्रिय हीं रत्‍नें मृतघटिकावदनीं

दिसतिल तुजला, गोष्ट खरी परि मिलतिल का बघुनी ?

किंबहुना तें हसणें, रुसणें, गोडहिं ते बोल

दिसतिल नयनीं, श्रवणीं येतिल, सर्व परी फोल !

ऐंद्रजालिकें पेढे केले, मुखिं होती माती;

मृतघटिवदनीं तैशीं रत्‍नें, दुःअखचि ये हातीं.

गेल्या गेल्या आशा, पडल्या भस्माच्या राशी,

त्यांवरि घिरट्या घालुनि ये का कांहीं हाताशीं ?

मनोराज्यासम दृश्य मधुर तें परी भासमान,

परिणामीं हें कासावीसचि करिल तुझा प्राण.

सोड सोड रे नाद तयाचा यास्तव तूं सखया,

बघूं नको माघारा, पाहीं आगामी समया.

काळाच्या गर्भांत असति ज्या अजात घटि अजुनी

तयांकडे बघ सख्या, अतां तूं आशाळू नयनीं.

मृतघटिकांहीं नेलें तें तुज आणुनि देतिल त्या,

हताश होऊं नको फसुनिया नांदीं तूं भलत्या.

« PreviousChapter ListNext »