Bookstruck

प्रभु, तुज कवणेपरि ध्याऊं ?

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

प्रभु तुज कवणेपरि ध्याऊं ? ध्रु०

नामातीता तुजला स्वामी

संबोधूं मी कवण्या नामीं ?

किति असलों जरि सेवाकामी

केवि तुला सेवुं ? १

चिद्‌घन तूं, ही जड मम वाणी;

सुख तूं, ही दुःखाची खाणी;

अनंत तूं, हीं सांतचि गाणीं,

कैशी तव गाऊं ? २

रूपातीता रूपमृढ जन,

गुणातिरिक्ता गुणग्रस्त मन

केवि अचिंत्या ध्याइल चिंतुन ?

कैसा तुज लाहूं ? ३

अपार तुझें अगम्य वैभव,

हीन दीन मी मायासंभव,

कसे आळवूं नाथ, चरण तव ?

तेज कसें साहूं? ४

नामरुपाचा दृश्य पसारा

अवाढव्य हा अपार सारा !

बावरलों, किति सैरावैरा

मृगापरी धावूं ? ५

घनतिमिरीं मी बालक तान्हें

प्रकाशार्थ अति केविलवाणें

हात नाचवीं, टाहो जाणें,

केवि ह्रदय दावूं ? ६

माउलिला तुजला प्रभुराया,

चुकलों ! लागें आर्त रडाया;

लावशील का कधीं उरा या ?

कोठें तुज पाहूं ? ७

« PreviousChapter ListNext »