Bookstruck

स्वारी कशी येईल ?

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

कुणास ठाउक कवणे रूपीं येइल माझ्या घरीं ?

कशी तयारी करूं ? कशी मी अंगणि घालूं दरी ? ध्रु०

का वार्‍यावरि परिमळापरी अवतरेल तो तरी ?

का ढगावरी गर्जनेपरी येइल भूमीवरी !

काय विजेवरि लखलख येइल जशि सोन्याची सरी ?

नदीपुरावरि येइल का तो तरल तरंगापरी ?

घन राइमधिल का गोड लकेरीपरी ?

का स्मितसा निजल्या बाल-कपोलावरी ?

का मधुसा फुलल्या कमलदलाभीतरीं ?

यापरि करितां विचार साजणि, होतें मी बावरी. १

माळ गळां तार्‍यांची, रविशशि तळपति मुकुटावरी,

कर्णिं कुंडले; प्रभा न मावे सार्‍या भुवनांतरीं;

शंख, चक्र आणि गदा, पद्म हीं झळकति चारी करीं,

कोटिमदन ओवाळा ऐशी छबी शरीरावरी,

शंख-शिंग शिणखिणति, दणाणे चोप नौबतीवरी,

आणि पुढे ललकार 'इत इतो' चोपदारही करी;

श्यामकर्ण लखलख रथास खिंकाळती,

दो बाजु चामरें ध्वजा तशा फडकती,

गडगडाट चाले रथहि, दिशा कांपती,

काय दणाणत येइल ऐशी स्वारी दारावरी ? २

तारे सारे डोळे मिटती, सूर्यचंद्र धावती,

हाहाकारहि करिति दशदिशा, दिग्गज भांबावती,

चळचळ कांपति वारे, सागर जागजागिं गोठती,

जिकडे तिकडे शाइ फासली ब्रह्मांडाभोवती,

का सकळ काळिमा घनीभूत जाहली,

अति भयाण अस्फुट, उंच रोड साउली

करिं पाश-दंड, ही महिषावर बैसली !

शांत शुक्ल का यापरि येइल नेण्या तो नोवरी ? ३

« PreviousChapter ListNext »