Bookstruck

शहाणा झालेला राजपुत्र 7

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“रडू नका. मी देतो तो रस अंगाला लावा नि चितेवर निजा. तुम्हांला वेदना होणार नाहीत; परंतु जळून तर जाल. राजाला सांगून ठेवा, की माझी राख मात्र माझ्या घरी पाठवा!” राजपुत्र तो रस अंगाला लावून राजाकडे गेला. माझी राख माझ्याघरी द्या असे त्याने सांगितले. हजारो लोक तो प्रकार पाहत होते. चितेवर राजपुत्र निजला. अग्नी देण्यात आला. गहरी पेटली चिता. राजपुत्र जणू शांत झोपला होता. त्याच्या देहाची राख त्याच्या घरी पाठवण्यात आली. रात्रीच्या वेळेस तो एक भाऊ ती राख घेऊन बाहेर पडला. तो सर्प बनला. राखेचे भांडे तोंडात धरून तो पाताळात गेला. त्याने शेषाला सारा वृत्तान्त निवेदला.

“महाराज, या राखेवर शिंपायला अमृताचे चार बिंदू द्या.” सर्प म्हणाला.

“हा साप तुझ्याबरोबर अमृतबिंदू घेऊन पृथ्वीपर्यंत येईल.”

शेष म्हणाला. एक सर्प या सर्पाबरोबर निघाला. दोघे पृथ्वीवर आले. पाताळातील सर्पाने राखेवर अमृत शिंपले नि तो निघून गेला. राखेतून राजपुत्र उभा राहिला. जवळ भाऊही होता. तो म्हणाला, “दादा, जा व राजाला सांग की, त्याच्या वडिलांना स्वर्गात करमत नाही. खुशमस्क-याची आठवण येते. त्याला लवकर पाठवून द्या!”

राजपुत्र परत आलेला पाहून सारे आश्चर्यचकित झाले. राजवाड्यासमोर ही गर्दी! राजपुत्राने राजाला त्याच्या वडिलांचा निरोप सांगितला. राजाने खुशमस्क-यास बोलावले व सांगितले,

“अरे, माझे बाबा तुझी आठवण काढीत आहेत. जा तू त्यांच्याकडे!”

“मी कसा जाऊ?”

“या राजपुत्रास वाठविले त्याच मार्गाने तूही जा!”

लोकांनी टाळ्या पिटल्या. “दुष्टाची बरी जिरली!” कोणी म्हणाले. राजपुत्र लगबगीने आपल्या राजवाड्यात आला व भावंडांना म्हणाला, “हा राजा लहरी दिसतो. वेडपट दिसतो, येथे राहण्यात अर्थ नाही चला आपण जाऊ.”

« PreviousChapter ListNext »