Bookstruck

अप्सरा कोण?

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »

हिंदू पुराणांनुसार अप्सरा या स्वर्गाधिपती इंद्राच्या दरबारात नृत्यगायन करणार्‍या स्वर्गीय सुंदर्‍या होत्या. ऋग्वेदानुसार काही अप्सरा या गंधर्वांच्या पत्‍नी किंवा सहचारिणी असल्याचा उल्लेख मिळतो. नृत्य, संगीत, गायन अशा अनेक कलांत अप्सरा निपुण असल्याचे सांगितले जाते. मानवांची नैतिक मूल्ये अप्सरांना बंधनकारक नसावीत असे अनेक कथांतून दिसते. इतर कोणतेही मर्त्य राजे, देव-दानव किंवा ऋषी-मुनी स्वतःपेक्षा श्रेष्ठ होऊ नयेत आणि इंद्रपद बळकावू नयेत म्हणून या राजांना व ऋषी-मुनींना भुलवण्यासाठी, त्यांच्या उद्दिष्टांपासून त्यांना दूर सारण्यासाठी देवराज इंद्र या अप्सरांना त्यांचा तपोभंग करण्याकामी वापरत असे असे पुराणांत दाखले मिळतात. अप्सरा सदैव तरुण असतात, त्यांना वृद्धत्व नाही.

भागवत पुराणानुसार कश्यप ऋषींच्या बारा पत्‍नींपैकी मुनि (ऊर्फ वसिष्ठा) ही पत्‍नी बर्‍याच अप्सरांची माता असल्याचे दिसते. अन्य पौराणिक वाङ्‌मयात कश्यपाच्या अरिष्टा (ऊर्फ प्राधा), ताम्रा व खशा नामक पत्‍नी काही अप्सरांच्या आई असल्याचे उल्लेख आढळतात. काही कथांमध्ये स्वतः ब्रह्मदेवाने अप्सरांची निर्मिती केल्याचेही वाचायला मिळते. याशिवाय, मेरु पर्वताची रवी करून केलेल्या समुद्रमंथनातून 'रंभादि देवांगना' निघाल्याचा उल्लेखही सापडतो.

Chapter ListNext »