Bookstruck

उंदीर, कोंबडा व मांजर

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एका उंदराचे पिलू प्रथमच बिळातून बाहेर पडले होते, ते थोडा वेळ इकडे तिकडे फिरून पुन्हा बिळात गेल्यावर आईला म्हणाले, 'आई, या लहानशा जागेतून मी जरा मोकळ्या जागेत जाऊन आलो तर किती मजा पाहिली, रस्त्याच्या बाजूने फिरत असता मी दोन प्राणी पाहिले. एक प्राणी गडबड्या स्वभावाचा असून त्याच्या डोक्यावर तांबड्या रंगाचा तुरा होता. तो जेव्हा जेव्हा मान हलवी तेव्हा तेव्हा त्याचा तुराही हालत असे. मी त्याची मजा पाहात होतो तोच त्याने आपले दोन्ही हात हालविले व मोठ्याने ओरडला. दुसरा प्राणी मात्र शांत व सभ्य होता. त्याच्या अंगावर रेशमासारखी मऊ लोकर होती. तो देखणा होता व त्याच्या वागण्यामुळे त्याच्याशी मैत्री व्हावी असे मला वाटले.' हे ऐकून उंदरी त्याला म्हणाली, 'वेड्या पोरा ! तुला काहीच अक्कल नाही. नुसत्या दिसण्यावर जाशील तर फसशील, हे लक्षात घे. तू जो प्राणी प्रथम पाहिला व ज्याच्या आवाजाची तुला भिती वाटली तो बिचारा कोंबडा निरुपद्रवी असून एखादेवेळी त्याच्या मांसाचा थोडासा तरी भाग आपल्याला मिळण्याची शक्यता असे, पण रेशमासारख्या मऊ अंगाचा जो दुसरा प्राणी तू पाहिलास ते दुष्ट, लबाड आणि क्रूर असे मांजर असून उंदराच्या मांसाशिवाय त्याला दुसरा पदार्थ फारसा आवडत नाही, हे लक्षात ठेव.'

तात्पर्य

- बाह्य देखावा व सौंदर्य याच्यावरून कोणाच्या अंतरंगाची परीक्षा करता येत नाही.
« PreviousChapter ListNext »