Bookstruck

सरदार व त्याचा घोडा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एक सरदार लढाईच्या वेळी आपल्या घोड्याच्या खाण्यापिण्याविषयी फार काळजी घेत असे. पुढे काही दिवसांनी लढाई संपली व त्या सरदाराचा पगार कमी झाला, त्यामुळे तो आपल्या घोड्याला अगदी निष्काळजीपणे वागवू लागला. ज्या घोड्याने पूर्वी त्याला भर लढाईच्या जागी मोठ्या शौर्याने आपल्या पाठीवर नेले होते त्याच घोड्याला तो आता मोठमोठी लाकडे वाहून नेण्याच्या कामाला लावू लागला. शिवाय त्याची काळजी घेईनासा झाला. त्यामुळे घोडा अशक्त होत चालला. पुनः एकदा लढाई सुरू झाल्याची बातमी आली असता सरदाराला लढाईवर जाण्याचा हुकूम आला. सरदार घोड्याची काळजी घेऊ लागला, तो शक्तीशाली व्हावा म्हणून त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था उत्तम प्रकारे ठेवली, पण घोड्याला त्याचे ओझे उचलण्याची ताकद नसल्याने तो वरचेवर अडखळू लागला. मग तो घोडा सरदाराला म्हणाला, 'तू आपल्या निष्काळजीपणाने ही स्थिती प्राप्त करून घेतलीस. माझ्या पाठीवर लाकडं लादून नि माझं खाणं तोडून तू मला घोड्याचा गाढव बनवलंस. अशा स्थितीत लढाईच्या कामी मी जर पूर्वीसारखा तुझ्या उपयोगी पडेनासा झालो तर त्यात माझ्याकडे दोष नाही.'

तात्पर्य

- एखाद्या प्राण्याची जरुरी नसली म्हणजे त्याला पायाखाली तुडवायचे व जरुरीच्या वेळी मात्र त्याची फार काळजी घ्यायची हे हितकारक नाही.
« PreviousChapter ListNext »