Bookstruck

सापाचे शेपूट

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एकदा एका सापाच्या शेपटाने त्याच्या डोक्याविरुद्ध बंड उभारले. ते म्हणाले, 'कोणत्याही प्राण्याच्या एकाच शेपटानं वाटेल तिकडं जावं अन् दुसर्‍या शेपटाला त्याच्या मनाविरुद्ध आपल्या बरोबर ओढत न्यावं ही मोठ्या लाजेची व जुलुमाची गोष्ट आहे.' हे शेपटाचे बोलणे ऐकून डोक्याने त्याची समजूत घालण्याचा खूप प्रयत्‍न केला. ते म्हणाले, 'शेपटाला डोळे नाहीत, मेंदू नाही. यामुळेच त्याला वाटेल तिकडे जाण्याचे स्वातंत्र्य नाही.' पण डोक्याचा हा युक्तिवाद शेपटास आवडला नाही. त्याने आपला हट्टीपणा तसाच चालू ठेवला. ते पाहून डोक्यास फार राग आला. त्याने त्यास वाटेल तिकडे जाण्याची परवानगी दिली. मग शेपटाने आपल्या इच्छेप्रमाणे फिरावयास सुरुवात केली. साप शेपटाकडून मागे सरपटत चालला असता एका उंच कड्यावरून खाली घसरला व त्यामुळे त्याच्या सर्व अंगाला फारच लागले. आपल्या मूर्खपणामुळे असे घडले हे पाहून शेपटास फार लाज वाटली व डोक्याशी स्पर्धा करण्याचे त्याने अजिबात सोडून दिले.

तात्पर्य

- प्रत्यक्ष अनुभवाशिवाय स्वतःची किंमत व कर्तबगारी काय आहे हे मनुष्यास समजत नाही.
« PreviousChapter ListNext »