Bookstruck

गाढव, कोल्हा आणि सिंह

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एक गाढव व एक कोल्हा यांच्यात एक करार झाला की, संकटाचे वेळी परस्परांनी एकमेकांना मदत करावी. नंतर दोघे शिकारीसाठी अरण्यात गेले असता, तेथे त्यांची एका सिंहाशी गाठ पडली. प्रसंग फार कठीण आहे असे जाणून कोल्हा लवकर पुढे जाऊन सिंहाला भेटला व म्हणाला, 'माझ्या जीवाला धक्का लागणार नाही असे वचन जर दिलंत तर हे गाढव तुमच्या हाती देण्याची मी तजवीज करतो.' सिंहाने ती गोष्ट कबूल केली. मग गाढवाजवळ जाऊन कोल्ह्याने त्याला लबाडी करून एका खड्यात पाडले व ती गोष्ट सिंहाला कळविण्यासाठी तो त्याच्याजवळ आला. तेव्हा गाढव आपल्या हाती आला असे पाहून सिंहाने प्रथम कोल्ह्याला पंजात पकडून फाडून टाकले व नंतर सावकाश गाढवाला मारून खाल्ले.

तात्पर्य

- मित्रांचा विश्वासघात करून स्वतःचा जीव वाचविण्याचा प्रयत्‍न करणे हे अधमपणाचे लक्षण होय व त्याचा परिणाम कधीही चांगला होणार नाही.
« PreviousChapter ListNext »