Bookstruck

बढाईखोर माणूस

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एक माणूस फार वर्षे प्रवास करून आपल्या घरी आला व आपण परदेशात असताना काय मौजा पाहिल्या हे त्याने आपल्या शेजार्‍यापाजार्‍यांना तिखट मीठ लावून सांगितले. आणि अगदी शेवटी एक थाप ठोकून दिली की, 'मी अलकावतीला गेलो असता तेथील लोक पंधरा पंधरा हात उंच उड्या मारतात पण त्यांनी माझ्याशी पैज लावली असता माझ्याइतकी उंच उडी एकालाही मारता आली नाही.' ऐकणार्‍या कोणालाही ही गोष्ट खरी वाटली नाही. तेव्हा त्यांची खात्री करण्यासाठी तो नाना प्रकारच्या शपथा घेऊन लागला. त्या वेळी त्या लोकातील एक माणूस त्याला म्हणाला, 'अहो, अशा शपथा कशाला घेता. हातच्या कंकणाला आरसा कशाला ? या वेळी तुम्ही अलकावतीला आहात असं समजून तिथे जशी उडी मारली तशी इथंही मारून दाखवा म्हणजे झालं.' हे ऐकताच त्या बढाईखोर माणसाचे तोंड ताबडतोब बंद झाले.
तात्पर्य
- आपण प्रवासात पाहिलेल्या गोष्टी फुगवून सांगण्याची काही लोकांना सवय असते, पण एखादेवेळी त्यांचेच बोलणे त्यांच्या गळ्यात येऊन त्यांची फजिती झाल्याशिवाय राहात नाही.
« PreviousChapter ListNext »