Bookstruck

वेताळ

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

"स्मशानवासी मी आहे भूतपाळ वेताळ

वर्ण असे माझा काळा, मन माझे बेताल !

कडकडते बिजली तैसे माझे हास्य कराल

खदिरांगारासम डोळे जळजळ करिती लाल !

कैलासेश्वर सांबाचा आहे गण मी ख्यात

समंध भूत पिशाच्चांचा राजा मज म्हणतात

उत्तररात्रीं तरुछाया लंबमान दिसतात

देह दिसे माझा तैसा-धड माझे गगनात !

भीषणता जेथे अपुला गाजविते अधिकार

संचरतो तेथे माझा देह भैरवाकार

थोर थोर वटवृक्षांच्या थंडगार छायांत

धरुन पारंब्यांना मी झोके घेतो शांत !

विहीर शेतातिल किंवा परसामधला आड

घुमून त्यात कधी देतो पारव्यांस पडसाद

दबा धरुनी रात्रीचा बसतो मी वेशीत

चुकार कोणी जो भटके त्यास करी भयभीत !

चिलीम विझवुनि पेंगाया लागे चौकीदार

खडा पहारा जागवितो त्याचा घेउनि भार

ललकारी देउनिया मी गस्त घालितो गस्त !

वेसरकराची ऐकुनि ती छाती होई धस्स !

सातिआसरा, बहिरोबा, म्हसोबाहि महशूर

जेथ तिव्हाठयावर बसती फासुनिया शेंदूर

फेरी करुनी मी येतो रात्रीचा तेथून

विकट हास्य करितो त्यांच्या मौजा मी पाहून !

लोक उतारे तिन्हिसांजा ठेवितात उतरुन

पाळत ठेवुनि त्यांवर मी नेतो ते चोरुन

डोकावुनि काळया डोही पाडी मी प्रतिबिंब

घामाने होउनि जाई भ्याडाची तनु चिंब

रानपठारावर केव्हा जाउनि मांडी ठाण

शीळ फुंकुनी घुमवितो आसपासचे रान

भूते मग होती गोळा तेथे चोहिकडून

हसती बागडती माझ्या भवती फेर धरुन !

गावशिवेवरती आहे वटवृक्षांचा पार

अवसेच्या रात्रीं अमुचा होत तिथे संचार

डमरुच्या तालावरती तांडव करितो सांब

आणि घालितो आम्हीही धुमाकूळ बेफाम

नाचत तालावर आम्ही येतो उडवित राळ

लोळ विजेचा उठे तसा भडकुन त्याचा जाळ

उजेडात दिसती अमुचे चेहरे भेसूर

बघेल जो त्याचे व्हावे हृदय भयाने चूर

पाजळुनी केव्हा माझे भाईबंद हिलाल

जलसा करिती गाऊनी कर्कश अन्‌ बेताल

कभिन्न काळोखात अशा भीषण देखाव्यास

बघेल जो कोणी त्याला मूर्च्छा येइल खास !"

« PreviousChapter ListNext »