Bookstruck

शिवचरित्रमाला भाग ६१ मृत्युच्या ओठावर…

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

त्याचे असे झाले की , दि. १६ मे रोजी औरंगजेबाचे काही महत्त्वाचे सरदार त्याची भेट घेण्यासाठी किल्ल्यात आले. तसे ते रोजच येत होते. त्यांचा मुद्दा एकच. या सीवाला ठार मारा. त्याने आपले अनेक अपराध केले आहेत. जहाँआरा बेगम ही बहीण. तिचा मुद्दा आणखीन वेगळा. ती म्हणत होती की , या सीवाने शाहिस्तेखानाची मुलगी पळविली. ती आपली मामेबहीण होती. याच सीवाने सुरत शहराचे मला मिळणारे जकातीचे उत्पन्न खलास करून टाकले. म्हणून याला ठार मारा. आज (दि. १६ मे) मात्र सारेचजण आग्रह करू लागले की सीवाला ठार माराच.

आणि खरोखरच औरंगजेबाने तिरीमिरीस यावे तसे येऊन म्हटले की , ‘ होय. मी सीवाला ठार मारणार आहे! ‘ हा त्याचा अचानक व्यक्त झालेला निर्णय ऐकताच सर्वजण क्षणभर विस्मितच झाले. बादशाहाने फर्मान तयार करण्याचा हुकुम सोडला. हे एक प्रकारे किल्ल्यात अगदी गुप्तपणे चालू होते. पण आश्चर्य असे की , ही भयंकर गोष्ट रामसिंगला त्याचे घरी समजली. तो कमालीचा बेचैन झाला. त्याने तातडीने मिर्झा मोहम्मद अमीनखान मीरबक्षी या फार मोठ्या सरदाराकडे धाव घेतली. रामसिंगने मीरबक्षीला कळवळून विनंती केली की , माझा अर्ज बादशाहांना आत्ताच्या आत्ता आपण जातीने जाऊन सादर करावा. मीरबक्षीने त्याची विनंती खरोखरच मान्य केली. रामसिंगने बादशाहासाठी अर्ज लगेच तयार केला. दिला. तो घेऊन मिर्झा किल्ल्यात गेला मग स्वत:च रामसिंग बादशाहाकडे का गेला नाही! त्याचे कारण बादशाहाची अशी अचानक भेट घेण्याचा अधिकार रामसिंगला नव्हता. तो चौथ्या दर्जाचा सरदार होता.

मीरबक्षीने बादशाहाला जातीने त्वरित भेटून रामसिंगचा अर्ज दिला. त्यात रामसिंगने असे म्हटले होते की , ‘ आपण शिवाजीराजांना ठार मारण्यासाठी फर्मान काढीत आहात. आपण सर्वशक्तीमान आहात. आपण राजांना ठार मारू शकता. पण आम्ही शिवाजीराजांना शपथपूर्वक सुरक्षिततेचा शब्द दिला आहे. हा राजपुतांचा शब्द आहे , तरी आपण राजांना ठार मारणार असाल तर प्रथम मला ठार मारा. मग शिवाजीराजांना मारा. ‘

हा अर्ज पाहून बादशाह चपापलाच. त्यातील पहिली गोष्ट अशी की , सीवाला ठार मारण्यासाठी फर्मान तयार करण्यासंबंधीची बातमी येथून बाहेर पडलीच कशी ? रामसिंगला कळलीच कशी ? दुसरी गोष्टी अशी की , रामसिंग म्हणतो की , ‘ मला प्रथम ठार मारा. मग सीवाला ठार मारा ‘ याचा अर्थ असाही उघडउघड दिसतोय की , मी जिवंत असेपर्यंत सीवाच्या अंगाला तुम्ही हात लावू शकत नाही. इथेच बादशाह चपापला. त्याने राजांना ठार मारण्यासंबंधीचे फर्मान थांबविले आणि मीरबक्षीला सांगितले की , ‘ रामसिंगला उद्या (दि. १७ मे) किल्ल्यात आम्हांस भेटावयास सांगा. ‘

शिवाजीराजांचे तातडीने मरण बादशाहाने पुढे ढकलले. दि. १७ मे रोजी रामसिंग किल्ल्यात दिवाण-इ-खासमध्ये बादशाहास भेटावयास गेला. भेटला. बादशाह रामसिंगला म्हणाला , ‘ तुझा अर्ज मिळाला. मंजूर आहे. पण सीवा आमच्या परवानगीशिवाय आग्ऱ्यातून निघून जाणार नाही आणि कोणतेही घातपाती कृत्य करणार नाही अशी तू ग्वाही देतोस का ? तू या गोष्टीला जामीन राहतोस का ?

प्रश्न भयंकरच अवघड होता. वादळाला जामीन राहण्यासारखेच होते हे. रामसिंग घरी आला. त्याने महाराजांना सर्व हकीकत सांगितली. महाराज ती ऐकून गंभीर झाले. बादशाहाचा आपल्याबाबतीतील डाव अगदी स्पष्ट झाला. महाराज शांतपणे उठले. त्यांनी रामसिंगबरोबर त्याच्या महालातील देवघरात प्रवेश केला. तेथील तुळसीबेल हातात घेतले. अन् देवाला वाहात त्यांनी रामसिंगला म्हटले ‘ भाईजी , तुम्ही बादशाहांना जमानपत्र लिहून द्या. मी जमानपत्राप्रमाणे वागेन. ‘

रामसिंगला हायसे वाटले. तो किल्ल्यात गेला. दिवाण-इ-खासमध्ये बादशाहास भेटला. जमानपत्र दिले. ते घेत बादशाह म्हणाला , ‘ रामसिंग , शिवाजीराजांना घेऊन काबूल कंदाहारच्या स्वारीवर जाण्याची तयारी कर. ‘

रामसिंगला हे सरळ वाटले. त्याने होकार दिला. रामसिंग किल्ल्यातून परतत असताना रादअंदाझखान उर्फ शुजाअतखान सुभेदार याने रामसिंगला म्हटले की , ‘ महाराज कँुवरजी , मैं भी आपके साथ काबूल आनेवाला हूँ! मुझे बादशाहका हुक्म हुआ है! ‘

हे ऐकले मात्र , आणि रामसिंग कमालीचा बेचैन झाला. यात बादशाहाचा डाव अगदी स्पष्ट होता की , काबूलच्या प्रवासात कुठेतरी घातपात करून शिवाजीराजांची अन् सर्वच मराठ्यांची कत्तल उडवायची. हा डाव राक्षसी होता. या कत्तलीत रामसिंगचीही आहुती पडणार होती. याच शुजाअतखानाने बादशाहाच्या हुकुमावरून अलवार येथे तीन हजार सत्नामी गोसावी बैराग्यांची कत्तल केली होती. अशा या क्रूरकर्म शुजाअतखानच्या जबड्यात महाराज , शंभूराजेसुद्धा सापडणार होते. आत्ता जणू ते मृत्युच्या ओठावर पावले टाकीत होते.

- बाबासाहेब पुरंदरे

« PreviousChapter ListNext »