Bookstruck

जत्रातील प्रेम कथा

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter List

पाराकं आरगन वाजल.बॅन्डवाल आलं.ते आलं की सलामी देत्यात. आरगनाचा मोठा आवाज सा-या गावात घूमू लागला. तशी बारकाली पोरं...पोरी चींगाट पाराकं पळाली. मोठाली बरीचं माणसं तिथचं होती. कुणी रावश्याच्या दुकानाच्या दारात.. कुणीबुणी चावडीच्या दगडाला बूड टेकून बसलेली… आज गावची जत्रा.शेताभीतात कुठं जाता येतं?  तिथचं टायमपास करीत बसलेली.चार पाच टोळभैरी पोरं भी व्हती.सांवताच्या घराला पाठ देउन बसलेली. पोरं कुठं नुसते गप बसत आसतेत व्हयं? मोबाईल चिवडीत होती.बँन्डवाल्यानं सलामी दिली.आगोदर.. गणपतीची आरती.मग एक मस्तं गाणं.. वाजवल.त्यांच्या भोवती गर्दी जमा झाली आणि ते थांबले.सलामी झाली की ते पारावर टेकलं. आरगानाची गाडी तिथचं पारा म्होंरं सोडली होती.त्या गाडीभोवती पोरानी गराडा टाकला.तेवढयात आशुक्या व इलाश्या आलं.कुठं होतं नि कुठं नाय. गापकुणी बोळीतून आलं.डायरेक्ट बॅन्डवाल्या पाशीचं हजर झालं. दोन्ही हात वर करून लगेच आशुक्या म्हणाला,”बजावं…. बजाव” दोघ ही पंगाट झालेले.

”आताच सलामी झालीय मालक.” बँन्डवाल्या आत्म्यानं जरा आदबीनं त्यांना सांगितलं. जत्राच्या कारभरात सारचं मालक आसत्यात. उगच कशाला कुणाला अंगावर घ्या. बँन्डवालं तसल्या कामाला लय चाप्टरं आसत्यात. पेताडाच्या कशाला नादी लागत्यालं.

“काय सलामी झाली?कुणाला इचारून झाली? ते बाकी काय माहीत नाय.गाणं बजाव.झींग झींग झींगाट…” त्यानं त्वांडानचं गाणं सुरू केलं.हातानच मांडीवर वाजवायला सुरू केलं.त्वांडानं आवाज काढी. झींग झंग.. झींगाट… सारं पोरं भोवताली जमा झालेले.यांना रंग चढलेला… गाणं म्हणता म्हणता नाचाया भी लागली.आता आरगाना भोवती चीगुरखाना गोळा झालाच होता.ते गाणं म्हणायला लागली की पोरं भी त्वांडनचं गाणं वाजाया लागली.असाच त्वांडातून बँन्डंबाजा सुरू झाल्यावर सारी लोकचं  बघया लागली.सूभना नानाचं पीत खवळलं.त्याचं नाय कुणाचं भी पीत खवळणचं ना? उग चाराण्याची प्यायची अन बारा आण्याची नशा आणायची.गावच्या जत्रात असा बीन पैशाचा तमाशा उभा केलेला बरा नव्हता.

“आर,आशुक्या…काय लावलं रं ये.”

“दिसतं नाय काय? आरं,बजाव.. बजाव…” त्याला बोललल्यावर ते जास्तचं चेकाळला.मग तर गडयानी ढोल हातात घेतल्यावाणी ॲक्शनचं घेतली.तसा साराचं चिगुरखाना चेकाळला.सुभानाला जास्तचं राग आला.सुभानाना उठूनचं त्यांच्या अंगावर गेला. त्याला सारे ते खिदाडून लावायचे होते.”मरा तिकडं देवापुढं काय लावलयं हे.”सुभानना त्यांच्याजवळ आला की सा-यांनीच गराडा टाकला.त्याच्या भोवती फेर धरून नाचायला लागली. लेकरं भोवती नाचाया लागली. तेव्हं जसा अंगावर धावून यायचा… तशी पोर माग पळायची… रागीट गडी पण पार विरघळला.”आयला हे नाय सुधरायचं.” बँन्डंवाल्याची भी पंचायत झाली. नाय वाजवावा तर आशुक्या चांगलाच फास्ट सुटला होता.पंग झालेले… सरपंचाला  भी काहीबाही म्हणयाचं.पाटला भी… काही बाही म्हणायचा. काहीबाहीम्हणजी आया माहीचं उजगारायला लागला.उगच जास्त काही पेटायचं.त्यापेक्षा एक दोन गाणी वाजू.असं बँन्डवाल्यानचं ठरवीलं. बँन्डंवाला आत्म्या म्हणला,”पोरावं फुका रे. झींगाट….!”

                                  आरगानावर गाण सुरू झालं. गाणं सुरू झालं की ते बेवडे आत मध्ये शिरले.एक एक म्हणता सारीचं पोरं आत रिंगणात शिरली.सारेच झीगाट झाले. सारीच पोरं सुरू झाली.पोरं चांगली रंगात आली.एका चढ एक गाणी सुरू झाली.पेताडं बँन्डवाल्याला पैसं सोडायला लागली.पैसं दिसल्यावर त्यांना भी चांगलाच चेव आला.गाण्यावर गाणी वाजू लागली.आता नुसती गाणीच वाजत नव्हती तर डान्सं ही सुरू झाला. असा भारी डान्सं सुरू झाल्यावर त्यांना गराडाचं पडला. कुणी पैसंच काय उधाळीत…. कुणी उपारणीच काय वर फकीत… हे दोघचं.. शहाणे बाकी सारे… चीगुरखनाच. नाचायलाचं लागलेत म्हणल्यावर पोरीसोरी भी भीताडाच्या आड दडून बघाया लागल्या.देवाला नीवद घेऊन चालल्या आयाबाया थांबून पहाया लागल्या. काही बेणी.त्याची भी शुटींग करायला लागली.आता आपली शुटींग करायला लागलेत म्हणल्यावर त्यांना भी चेव आला.जास्तचं आंग हलायला लागली.काही नाचता नाचता पडायला लागली. फुपाटा… रेंदा काहीचं कळतं नव्हता. कुणाला सुध्दीचं राहिल्या नव्हत्या.

                           पाराकं लय्य्च मज्जा सुरू झाली हे काय झाकतय व्हयं? संत्याचा तर जीवाची उलाघाल व्हायला लागली. या वर्षी….साळाच्या गॅदरींगमध्ये त्यानं लय भारी डान्सं केला होता.टॉपच… एकचं नंबर…पैसं भी लयं भेटलं होतं त्याला. आता सारं पोरं त्याला डान्सरच म्हणायची. त्याच्या बरूबर… सातवीची सीमी नाचली होती. पोरं तिला तर आर्चीच म्हणायला लागले होते. सीमी तर घराच्या बाहेरच निघत नव्हती. कशी निघणं. बाहेर आली कीच पोरं.. आर्ची आली.. आर्ची आली.. म्हणून चिडवायचे. संत्यानं शेळया तश्याच ठेवल्या.चावी काळयाच्या म्हतारीकं ठेवली नि गडी चिंगाट पळाला.ते नुसतं कशाचं पळतं. अंग हालवीतचं पळायचं. लोकाला वाटायचं हे नाचतचं चाललं की काय. संत्या डावापाशी आला. त्याचा पार हीरमुडचं झाला. त्याचा बाप आशुक्या डावातच होता. त्याचा तर आता नागीन डान्सचं सुरू झाला होता. पडला की त्याला उठताचं येत नव्हतं.पडल्या जाग्यावरचं गडी नाचायचा.संत्याचा हीरमुड तर झालाच पण त्याला राग ही लयं आला. आपल्या बापाचा असा अवतार पाहून कुणाला बरं वाटणं.सारी पॅन्टं रेध्यांन भरलेली…. सारं शर्ट भरलेल..भरकं उपारणं….तसचं वर उडवी. सारी पोरं हासतं. सुताराचा दीप्या त्याच्याकडं पाहून म्हणाला,”संत्या, तुझा बापाचा लय्य्चं भारी डान्सं गडया.लय्य्चं झीगाट नाचतोय.” त्याला लयचं राग आला.दोनचार त्याच्या थोबाडात माराव्यात

Chapter List