Bookstruck

त्यागातील वैभव 4

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“बाबा, आम्हाला आठवून तुमच्या हृदयाचे अगदी पाणी पाणी होऊन गेले असेल, नाही? परंतु काय करायचे? आताही मी आले आहे; परंतु लगेच जायचे आहे.”

“भेटलीस, पुरे झाले. कर्तव्यकर्म ज्याला त्याला आहे.”

“बाबा, तुमच्याजवळ एक गोष्ट मागायला आले आहे. लग्न झाल्या दिवसापासून मी कधी उत्सव समारंभ केला नाही. आता मी मोठा उत्सव करणार आहे. सर्व देवांगनांना बोलावणार आहे. त्यांच्या ओट्या भरणार आहे. तुमची काही संपत्ती मला द्या. सर्व देवांगनांची हिरे-माणकांनी ओटी भरवी, मोत्यांच्या अक्षता कपाळई लावाल्यात, असे मनात आहे. माझा इच्छा तुमच्याशिवाय कोण पुरविणार? आणि सुंदर रंगाची पोवळीही हवी आहेत, त्यांची तारणे करून लावीन. जे जे सुंदर असे तुमच्याजवळ असेल, ते ते द्या.”

“बाळे, सारे देईन हो! तुला काही कमी पडू देणार नाही. तुझा गरुड पाठव. तो करील खेपा. तू किती नेणार? तुझा पिता रत्नाकर आहे. माझ्याजवळ मोत्यांची कोट्यावधी शेते आहेत. हिरेमाणकांच्या अनंत खाणी आहेत. पोवळ्यांची लागवड कमी केली होती; परंतु पुन्हा वाढवण्याचे ठरवीत आहे. तू कधी मागितलेच नाहीस. मुलांचे लाड पुरवावेत, त्यांच्या हौशी पुरवाव्यात, हाच आईबापांचा आनंद असतो.”

लक्ष्मी पित्याजवळ दोन दिवस राहिली. नंतर निरोप घेऊन जावयास निघाली. पित्याने तिला अमोल अलंकार दिले. सूर्यकिरणांसारखी वस्त्रे दिली. पुत्रीला निरोप देताना त्याची विशाल छाती दु:खाने खालीवर होऊ लागली. त्याला अपार हुंदका आला, तो आवरेना.

“बाबा, हे काय? असे रडू नका. मुली का घरी राह्यच्या असतात? त्या पतिगृही जाण्यातच त्यांची कृतार्थता! मी आता मधूनमधून येत जाईन.”

“मी तुझ्या पतिदेवांना एक प्रार्थना करणार आहे.”

“ती कोणती?”

« PreviousChapter ListNext »