Bookstruck

त्यागातील वैभव 8

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“बरे, नको जाऊस. पार्वतीला आपोआप कळेलच की वैकुंठात हळदीकुंकू आहे म्हणून. तो नारद आहे ना, तो सारी बातमी नेईल. देवलोकीचे ते जिवंत वृत्तपत्र! आणि बोलावले तरी पार्वती येणारही नाही. सा-या देवांगना नटूनथटून येणार. पार्वतीला यायला लाज वाटेल. तिच्याजवळ ना धड वस्त्र, ना एखादा दागिना. राहू दे. बाकी सर्वत्र तर जाऊन ये. ब्रह्मदेवाकडे जा. गणपतीकडे जा. कोणास वगळू नकोस. समजलास ना?”

गरुड स्वर्गलोकी गेला. सर्व देवांच्या बायकांना आनंद झाला. आज त्यांना मिरवायला सापडणार होते. सा-या देवांगना आपआपले अलंकार घासून-पुसून स्वच्छ करू लागल्या. तगवनीची राखीव लुगडी सर्वांनी बासनातून काढली. त्यांनी नीट वेण्याफण्या केल्या. कल्पवृक्षांची फुले त्यांनी केसातून गुंफिली. त्या अप्सराही नटल्या. इंद्रानीने सर्वांचे झाले का म्हणून चौकशी केली, सारी सिद्धता झाली.

“आई! तुझ्याबरोबर मी येतो.” जयंत म्हणाला.

“तू का आता लहान? सा-या बायका हसतील.” इंद्राणी म्हणाली.

“आईला मूल कितीही वाढले तरी लहानच असते, असे तूच ना परवा बाबांना म्हणालीस?”

“तू ऐकायचा नाहीस. हट्टी आहेस अगदी!”

“जयंत, इकडे ये. जायचे नाही.” इंद्राने रागाने सांगितले.

“जा बाळ, मी तुला खाऊ आणीन. पोवळ्याच्या माळा आणीन. असा हट्ट नको करू. ते मारतील हो नाहीतर!”

“तू आता त्याच्याशी बोलत नको बसू. निघा तुम्ही आणि वेळेवर या.”

“एक दिवस मेले जात आहोत जरा बाहेर, तर लगेच हुकूम, ‘वेळेवर या.’ आमचे आटपेल तेव्हा येऊ. समजले ना?”

“चल जयंता, का हवे चौदावे रत्न?” इंद्राने मुलावर राग काढला.

जयंत रडत रडत तेथे उभा राहिला. इंद्राने बकोटी धरून त्याला ओढीत नेले. इंद्राणीने मागे वळून पाहिले. जयंताला बरोबर न्यावे असे तिला वाटत होते; परंतु इतर बायका हसतील म्हणून तिने त्याला बरोबर घेतले नाही. ‘एवढा रडतो आहे तर घ्या त्याला बरोबर.’ असेही इतर देवांगनांनी म्हटले नाही.

« PreviousChapter ListNext »