मैत्री
लडकी है एक नाम माधुरी है..
माधुरी आणि मी 1984 पासून ते आजवर घट्ट मैत्रिणी आहोत ..अकरावीला RYK कॉलेजमध्ये आम्ही प्रवेश घेतला होता आणि रविवार कारंजा बसस्टॉपला पहिल्यांदा भेटलो..ती रविवार कारंजाला तर मी वकील वाडीत रहायचे..दोघींचे स्वभाव तसे भिन्न तरी मैत्रीचे बीज अंकुरले होते..माझा शांत आणि पडखाऊ स्वभाव अगदी जाऊ दे ना असं म्हणत सोडून देण्याचा होता..माधुरी मात्र थोडा कुठे अन्याय झाला की पेटून उठत असे..ती सोबत असली की मला फार संरक्षक वाटायचे..खचाखच भरलेल्या बस मध्ये कंडक्टर सुटे पैसे परत करत नसे..85 पैसे तिकीट होते..मग माधुरी त्याच्याशी तत्वाने भांडली..तेव्हाच दूरदर्शनवर रजनी नावाची मालिका चालू होती..प्रिया तेंडुलकरचे काम फार छान होते..
लडकी है एक नाम रजनी है..
रजनी की एक ये कहानी है..
मग आम्हाला ती साक्षात रजनी भासू लागली..माधुरी आधीपासून अतिशय कर्तृत्ववान असल्याने तिचे बाबा तिला कौतुकाने आमचा माधवराव असे म्हणायचे..
कॉलेजमध्ये तर तिला आणि मला हमखास फिशपौंड असायचा ..तू जहाँ जहाँ चलेगा मेरा साया साथ होगा..ती दिसली की मी असायचेच..आम्ही एकमेकींच्या घरी पडीक असायचो..तिला माझ्या आईच्या हातचा मेथीचा लाडू आवडायचा तर मला मावशी करायच्या तो बेसनलाडू आवडायचा..अजूनही ती चव जिभेवर रेंगाळते आहे.. आणखी एक आठवण म्हणजे माधुरीकडे महालक्ष्मी असल्या की मला हमखास जेवणाचे आमंत्रण असे..मग मी मावशींना सांगायचे की मी तुम्हाला मदत करते कामात आणि चांदीची भांडी चमकवून देते..त्यांच्याकडच्या पूर्वापार चांदीच्या भांड्यांचा घाट मला खूप आवडायचा.. आजही मी कधी चांदीचे भांडे घेतले की माधुरीच्या घरातील महालक्ष्मी डोळ्यासमोर येतात..
अशा अनेक आठवणी..जेव्हा आम्ही बसच्या भाड्याचा रुपया वाचविण्यासाठी पायी पायी कॉलेजला जायचो आणि मग शालिमारला येऊन भगवतीवर प्रसिद्ध भेळ पाणीपुरी खायचो..भौतिक सुखांची रेलचेल कदाचित तेव्हा नसेल पण मैत्रीचे समाधान अपार होते आणि आजही आहे..तिच्या माझ्या नातेवाईकामध्ये आम्ही ज्ञात होतो..रेखा आणि विद्या तर नेहमीच माझ्या लहान बहिणी मी समजते.
श्री.संजय कोंडो ह्यांची सार्थ साथ आहेच आणि पुजासारखी समजूतदार मुलगी देवाने तिला दिली आहे..कधी नातवाशी ती बोलत असते तेव्हाचे तिचे हळवे वत्सल रूप मी न्याहाळले आहे...तिच्या लग्नाची तसेच लेकीच्या जन्माच्या वेळेस मी हजर होते..लेकीच्या लग्नाच्या वेळेस होते..दोन वर्षाच्या पूजाला सोडून करिअर सांभाळतांना होणारी घालमेल मी पाहिली आहे..तिची कामाप्रती असलेली निष्ठा माहीत आहे आणि त्यामुळेच ती यशस्वी झाली आहे..सासरीमाहेरी तसेच वर्गमित्रमैत्रिणींमध्ये ती अभिमान ठरली आहे.2006 मध्ये एकदा ती आणि मी गावात भेटणार होतो..तिच्यावर मी लेख लिहिला होता तो पेपरच्या कार्यालयात द्यायचा होता..मी वाट पाहत होते आणि मग कळले की तिला अपघात झाला आहे..तो बैलपोळ्याचा दिवस होता..तिची अवस्था पाहून मी घाबरलेच होते पण त्यातूनही ती बाहेर आली..पोळा आला की तो प्रसंग हमखास आठवतो..नोकरीनिमित्त ती ज्या गावांना फिरली तिथली माणसे तिने जोडली आहेत..प्रत्येक गावच्या स्वयंपाकिण बाईंना शहाणे करून सोडले आहे..
माधुरी अग किती लिहू अन किती नाही इतकं सारं मनात दाटून आले आहे..नुकताच 19 मे रोजी तुझा जंगी वाढदिवस साजरा झाला तेव्हा हा सारा आठवणींचा पट डोळ्यासमोर साकारला.. तू बोल ना मावशी असे पूजाने म्हणताच मी जास्त बोलूच शकले नाही..तुझे यश पाहून मन भरून आले होते..तुझे आवडते गाणे गायले..मोगरा फुलला..हो आपल्या मैत्रीचा मोगरा फुलला..👍
स्वाती पाचपांडे