Bookstruck

श्रीमंत बाजीराव पेशवे

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठी मुलखात जणू तेवढाच आत्मविश्र्वास व

स्वराज्यनिष्ठा निर्माण करणारा ‘संस्थापक पेशवा’!

दिल्लीच्या तख्तापर्यंत धडक मारणारा एकमेव मराठी लढवय्या म्हणजे श्रीमंत बाजीराव पेशवे. १७ एप्रिल,१७२० रोजी ; वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी पेशवाईची सूत्रे बाजीरावांच्या हाती आली. तल्लख बुद्धीने डावपेचांची आखणी करून आणि अद्वितीय शौर्याने त्याची अंमलबजावणी करून अवघ्या २० वर्षांत बाजीरावांनी मराठ्यांच्या नेतृत्वाला मराठी मुलखाच्या बाहेर प्रवेश मिळवून दिला. दक्षिणेत मराठ्यांचे नेतृत्व संपादणे व उत्तरेत मराठी सत्तेचा विस्तार करून सार्‍या बुंदेलखंडात मराठ्यांचा दबदबा निर्माण करणे ही बाजीरावांची महत्त्वाकांक्षा होती आणि ती त्यांनी बहुतांशी पूर्ण केली.

बाजीरावांनी १७२५ ते १७२७ ह्या काळात दक्षिणेत मराठ्यांचे नेतृत्व निर्माण केले. ह्याच वेळी निजामाने पुण्यावर हल्ला केल्याने त्यांना गुजरात दौरा अर्धवट सोडून यावे लागले. पण बाजीराव निजामाच्या मुलखात घुसल्याने स्वत:च्या मुलखाच्या रक्षणासाठी निजामाला पुण्यातून पळ काढावा लागला. १७२८ साली पालखेड येथे पराभव पत्करून निजामाने मुंगी-शेगांवचा तह केला, त्याचे पूर्ण खच्चीकरण झाले. अत्यंत मुत्सद्देगिरीने लढलेल्या या लढाईपासूनच बाजीरावांची ख्याती गनिमीकाव्याचा प्रभू  म्हणून झाली. १७३८ साली दिल्लीच्या रक्षणासाठी पातशाहने जेव्हा निजामाची मदत घेतली. त्या वेळीदेखील बाजीरावांनी भोपाळ येथे निजामाचा दारूण पराभव केला. नाईलाजाने निजामाला पुन्हा तह करावा लागला. या तहान्वये नर्मदा आणि चंबळमधील प्रदेश मराठ्यांच्या ताब्यात आला. भोपाळचा विजय म्हणजे बाजीरावांच्या कर्तृत्वाचा परमोच्च बिंदू होता. या विजयाने ते ‘हिंद-केसरी’ बनले, अर्थात यापूर्वीच पालखेड-डभईच्या विजयाने ते ‘महाराष्ट्र-केसरी’ बनलेलेच होते.

थोरल्या बाजीरावांनी मराठी सत्तेचा झेंडा उत्तरेत फडकविल्याने जसे त्यांना बृहत्तर महाराष्ट्राचा संस्थापक म्हटले गेले, तसेच ते पुण्याचेही संस्थापक पेशवा आहेतच. उत्तरेकडील मोहिमांसाठी पुणे शहर सोईचे वाटल्याने त्यांनीच छत्रपती शाहू महाराजांची मर्जी संपादून पुणे हे आपले निवासस्थान बनविले. त्यांनी बांधलेला भव्य शनिवारवाडा हा त्या काळी देशाच्या राजकारणाचा मध्यबिंदू  बनला.

अशा ह्या धोरणी, कर्तृत्ववान थोरल्या बाजीरावाचे वर्णन करतांना यदुनाथ सरकार म्हणतात, ‘बाजीरावाने हिंदुस्थानच्या इतिहासात मराठ्यांना मानाचे स्थान मिळवून दिले. मराठेशाहीत छत्रपती शिवाजी राजांनंतरच्या कर्तृत्ववान पुरुषांत बाजीराव पेशव्यांची गणना केली पाहिजे. छत्रपतींनी महाराष्ट्र राज्याची निर्मिती केली व या राज्याला बृहत्तर महाराष्ट्राचे रूप देण्याचा प्रारंभ बाजीरावांनी केला.’

अवघे ४० वर्षांचे आयुष्य आणि केवळ २० वर्षांची कारकीर्द लाभलेल्या अशा या मराठी लढवय्याने २८ एप्रिल,१७४० रोजी नर्मदातीरावर रावेरखेडी  (मध्य प्रदेश) येथे शेवटचा श्र्वास घेतला.

« PreviousChapter ListNext »