Bookstruck

यशवंतराव चव्हाण

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
यशवंतराव चव्हाण

संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार!

‘आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार’ हे शब्द यशवंतरावांचे यथार्थ वर्णन करतात. सुमारे ४० वर्षांच्या कारकीर्दीत महाराष्ट्रातील राजकारणाला सुयोग्य दिशा देण्याचे आणि समतोल व जातिभेदरहीत राजकारणाचा वारसा देण्याचे कार्य त्यांनी केले. ज्ञानोपासक व अभिरुचीसंपन्न व्यक्तिमत्त्व, सुसंस्कृत व वैचारिक अधिष्ठान असलेले नेतृत्व, आणि मुत्सद्दी व विरोधकांचाही मान राखणारे संयमी राजकारणी असे त्यांचे गुणवर्णन करता येईल.

गुणांच्या बळावरच त्यांनी गरीब शेतकरी कुटुंबातील मुलगा ते राष्ट्रीय नेते अशी अविश्र्वसनीय झेप घेतली.सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी १९१३ मध्ये जन्मलेल्या यशवंतरावांना त्यांच्या आईने-विठाबाईंनी-निग्रहाने सांभाळले, घडवले. स्वातंत्र्यपूर्व काळात कराड येथे शालेय शिक्षण घेत असतानाच त्यांनी तिरंगा फडकवल्याबद्दल १८ महिने तुरुंगवास भोगला. वकिलीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते (नुकतेच लग्न झालेले असूनही) १९४२ च्या लढ्यात सातारा जिल्ह्यात आघाडीवर होते. या आंदोलनातही त्यांनी दोन वर्षांचा तुरुंगवास भोगला.

१९५६ मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. तसेच मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर (१ मे, १९६०) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचीच निवड झाली. १९६२ मध्ये चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंतरावांची नेमणूक देशाच्या संरक्षणमंत्रीपदावर केली. हा त्यांच्या कारकीर्दीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल. पुढील काळात त्यांनी उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री ही पदे यशस्वीरीत्या भूषविली. केंद्रात जनता पक्षाचे सरकार असताना (१९७७-७८) ते विरोधी पक्षनेते होते. तसेच पुढे ते केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षही झाले.

महाराष्ट्रात झालेल्या राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक विकासाची मुळे ही यशवंतरावांच्या कार्यात आहेत. त्यांनी असंख्य महत्त्वाचे निर्णय घेतले. काही ठळक निर्णय पुढीलप्रमाणे :

-   पंचायत राज या त्रिस्तरीय (जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत) व्यवस्थेची सुरुवात.

          (प्रशासकीय विकास)

-    राज्य पंचवार्षिक योजनांचा प्रारंभ. (आर्थिक विकास)

-    कोल्हापूर बंधार्‍यांचा प्रचार. कोयना व उजनी ह्या प्रमुख प्रकल्पांच्या उभारणीला गती. (मूलभूत सोयी सुविधांचा विकास)

-    १८ सहकारी साखर कारखान्यांची स्थापना. (सहकाराला चालना)

-    मराठवाडा (आत्ताचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) व शिवाजी विद्यापीठाची स्थापना. (शैक्षणिक विकास)

-    राज्यातील कृषी विद्यापीठांच्या स्थापनेतही संकल्पनात्मक सहभाग. (कृषिविकास)

-    मराठी साहित्य संस्कृती महामंडळ व विश्र्वकोश मंडळाची स्थापना. (सांस्कृतिक विकास)

यशवंतराव राजकारणात नसते, तर ते एक उत्तम साहित्यिक झाले असते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्रींपासून ते ना. धो. महानोरांपर्यंतच्या विचारवंतांशी व साहित्यिकांशी त्यांचे चांगले संबंध होते. यशवंतराव कवींच्या मैफिलींत रमणारे राजकारणी होते. कृष्णाकाठ, ऋणानुबंध आदी पुस्तकांतून त्यांच्यातील लेखकही दिसतो.

आज कोणत्याही क्षेत्रात, राष्ट्रीय महत्त्वाच्या घडामोडींत महाराष्ट्राचे वेगळेपण देशात उठून दिसते. हे वेगळेपण विकसित होण्यामध्ये आणि हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून जाण्याचे चित्र निर्माण होण्यामध्ये यशवंतराव चव्हाण यांचे अमूल्य योगदान आहे हे निश्र्चित!

« PreviousChapter ListNext »